www.24taas.com, पुणे
महापालिका निवडणुका संपल्या. आता राजकीय पक्ष हळूहळू त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात करत आहेत. निवडणूक संपताच पुणेकरांवर वॉटर मीटर लादण्याचा निर्णय स्थायी समितीनं घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून हा विषय वादग्रस्त होता. मात्र मुदत संपत आलेली असताना स्थायीनं घाईघाईनं घेतलेल्या या निर्णयावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणेकरांच्या नळाला लवकरच मीटर लागणार आहे. सुमारे पाच हजार रुपये किंमत असलेल्या या मीटरचा खर्चही पुणेकरांनाच उचलावा लागणार आहे. पुण्यात सुमारे सहा लाख वॉटर मीटर लागणार आहेत. वॉटर मीटरच्या या योजनेचा खर्च शंभर ते दीडशे कोटींच्या घरात जाणारा आहे. हे सगळे पैसे महापालिका पुणेकरांच्या खिशातून वसूल करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ही योजना थंड बस्त्यात होती.
निवडणुकीच्या तोंडावर या प्रस्तावाला हात लावण्याचं धाडस राजकीय पक्षांना झालं नाही. पण निवडणूक संपताच या प्रस्तावाला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. यावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. वॉटर मीटर बसवले तरच पाण्याची गळती आणि चोरी रोखता येऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. वॉटर मीटरबरोबरच जीवनावश्यक वस्तूंवरच्या जकातीत मोठी वाढ आणि पाणीपट्टीत वाढीचे प्रस्तावही स्थायी समितीसमोर आले होते. मात्र स्थायीनं ते परत पाठवले आहे. पण या निमित्तानं निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे खरे रंग समोर येऊ लागले आहे.