नारायण राणेंनी नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधक आणि मीडियाचा चांगलाच समाचार घेतला. मला बातम्यांमध्ये दिलेल्या प्राधान्यक्रमाबद्दल मी आभारी असल्याचं सांगत राणेंनी मीडियावर हल्ला चढवला. मला सतत दाखवल्याने टीआरपी वाढतो असंही ते म्हणाले. नगरपालिका निवडणुकीत वेंगुर्ल्यात मागील वेळेपेक्षा फक्त एकच जागा मिळाली तर मीडियाने माझा मोठा पराभव झाला जणू माझ्या हातून लोकसभेची जागाच गेली अशा स्वरुपाच्या बातम्या दिला.
मला कोकणी माणसाने राजकारणात मोठं केलं त्यांच्यामुळेच मी सर्व पदं मिळवू शकलो. जर उद्या कोकणी जनतेने पायउतार व्हायला सांगितलं तर त्याला माझी तयारी आहे. मी जनतेचा कौल मान्य करतो. मी पदाला चिकटून राहणार नाही. माझ्यामुळे अनेकांचे चांगले चालते त्यांनी याचा विचार करावा अशी स्पष्टोक्ती राणेंनी केली. मी पराभवाबद्दल आत्मपरिक्षण करेन असं त्यांनी सांगितलं.
कोकणात शिवसेना आणि भाजप संपली असून त्याबद्दल त्यांना दुख वाटण्यापेक्षा मला कमी जागा मिळाल्याचा त्यांना अधिक आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया देत त्यांनी सेना भाजपावर देखील शाब्दिक आसूड ओढले. विरोधकांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं आणि हाणा मारीच्या घटना घडवून आणल्याचंही राणे म्हणाले.
राष्ट्रवादीला सिंधुदुर्गात मिळालेल्या यशाबद्दल त्यांना विचारला असता त्यांनी कोकणात प्रचंड काम केलं असल्याचं तिरकसपणे सांगितलं. तसंच सावंतवाडीचा तलाव, राजवाडा, नरेंद्र डोंगर ही त्यांचीच निर्मिती असल्याचं सांगताना तरी मी अजुन अरबी समुद्राचा उल्लेख केला नाही असं सांगत राणेंनी राष्ट्रवादीला
हाणलं.
पोलिस महासंचालकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हेगारीच्या बाबतीत राज्यात सर्वात शेवटी म्हणजेच ३५ व्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्रकार संरक्षण कायद्या संदर्भात मी माझं मत तसेच कमिटीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे त्याबद्दल सांगणं योग्य होणार नाही. या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घेईल असं राणे म्हणाले.