मतदारराजा दिवस तुझाच आहे!

आजचा दिवस आळसात घालवण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी मतदान चुकवू नका असं आमचं आग्रहाचं सांगणं आहे. कारण आजचा निर्णायक क्षण तुम्ही चुकवलात तर परत पाच वर्षे ही नामी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. गेल्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाची वाट ज्यांनी लावली असेल किंवा शहराचा सत्यानाश केला असेल त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ती चुकवू नका.

Updated: Feb 16, 2012, 01:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

महापालिका निवडणुकीत मतदानासाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आज सकाळी कामावर जाण्याची घाईगडबड नसेल. खरंतर फार कमी वेळा घरी बिछान्यात पडून आराम करण्याची संधी येते तिचा लाभ तुम्ही आतापर्यंत घेतला असेल. तसंच घरी उपमा, शिरा, पोहे असा अल्पोपहाराचा छानसा बेतही एव्हाना उरकला असेल.

आजचा दिवस आळसात घालवण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी मतदान चुकवू नका असं आमचं आग्रहाचं सांगणं आहे. कारण आजचा निर्णायक क्षण तुम्ही चुकवलात तर परत पाच वर्षे ही नामी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. गेल्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाची वाट ज्यांनी लावली असेल किंवा शहराचा सत्यानाश केला असेल त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ती चुकवू नका.

मतदान करत आपला हक्क बजावत आम्हाला तुम्ही गृहित धरु शकत नाही हे आज तुम्ही आपला कौल देत राज्यकर्त्यांना ठणकावून सांगण्याची ही वेळ दवडू नका. आज अनेकजण तुम्हाला मतदान केंद्रावर नेण्यासाठी वाहनाची तजवीज करतील त्याचाही लाभ घ्या पण मतदान करताना ते गुप्त असल्याने तुम्हाला भीडभाड बाळगण्याचे काहीच कारण नाही. आज अनेकजण तुमच्या मतासाठी आर्जव करतील पण योग्य उमेदवाराची पारख करा भूलथापांना, प्रलोभनांना, भावनिक आवाहनांच्या मृगजळात अडकू नका. आजचा दिवस सर्वार्थाने तुमचा आणि तुमचाच आहे.