www.24taas.com, लंडन
भारताच्या सर्वाधिक आशा असणाऱ्या 'गोल्डन गर्ल' सायना नेहवाल त्या अपेक्षा आणखी वाढविल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने सोमवारी ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत झोकात प्रवेश केला.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तिने बेल्जियमच्या तान लियानेला २१-४, २१-१४ अशा फरकाने पराभूत केले. सलग दुसऱ्या विजयासाठी तिने अवघी २४ मिनिटे घेतली.
सायना नेहवालने पहिला गेम नऊ मिनिटांत जिंकून आघाडी मिळवली. सुरेख खेळी करत तिने पहिला गेम २१-४ ने जिंकला.
या वेळी तिने तानला प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही. हा गेम नऊ मिनिटांत संपला. त्यामुळे आता सायना सुवर्ण पदकांकडे एक पाऊल पुढे टाकते आहे.
ज्वाला-अश्विनीने केल्या आशा पल्लवित...
ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पाने तैपाईच्या चेंग वांग व चेंगला २५-२३,१६-२१, २१-१८ अशा फरकाने धूळ चारून विजयी सलामी दिली. अवघ्या ५५ मिनिटांमध्ये भारताच्या जोडीने बाजी मारून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
डबल्समध्ये भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनीने आशा पल्लवित केल्या आहेत. भारताला त्या डबल्समध्ये पदक मिळवून देणार का याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.