www.24taas.com, मुंबई
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियातही टीम इंडियाचा धुव्वा उडाल्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका होतं आहे. याच क्रिकेटपटूंना आता आणखी एक धक्का बसलाय. पराभवाच्या मालिकेमुळे क्रिकेटपटूंची ब्रँड व्ह्यॅल्यूही घसरली आहे.
टीम इंडिया 24 वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियन झाली. त्यामुळे भारतीय टीमवर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव झाला. त्याचप्रमाणे जाहीरातदारांनीही क्रिकेटपटूंशी कोटींच्या घरात करार केले. आपल्या प्रोडक्टची जाहीरात क्रिकेटपटूंनी केल्यामुळे आपल्या ब्रँडची व्ह्यॅल्यू वाढेल असा विचार या जाहिरातदारांनी केला. धोनी अँड कंपनीनं ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे सहाजिकच जाहिरातविश्वावरही क्रिकेटपटूंचाच दबदबा होता.
वर्ल्ड कपपूर्वी आणि नंतरही क्रिकेटपटूंमची जादू जाहिरातविश्वावर होती. कॅप्टन महेंद्रसिंग धोनी तर जाहिरातविश्वाचा सम्राट बनला. त्याचप्रमाणे जाहीरातीमुळे इतर क्रिकेटपटूंचीही चंगळ झाली. धोनी तर एका ब्रँडला प्रमोट करण्यासाठी 10 कोटी रुपये घेतोय. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यानं ब्रँड प्रमोट करण्यासाठी डबल किंमत घ्यायला सुवात केली. मात्र, पराभवाची मालिका सुरु झाल्यानं धोनी आणि इतर क्रिकेटपटूंच्या संलग्न ब्रँडना धक्का बसणार आहे. खराब कामगिरीचाच फटका भारतीय क्रिकेटपटूंना बसला आहे असच म्हणावं लागणार आहे.
धोनीकडे जाहिरातविश्वाचा राजा म्हणून पाहिलं जातं. मात्र, सध्या बॅट्समन आणि कॅप्टन म्हणूनही तो अपयशी ठरलाय. त्यामुळे त्याच्या ब्रँड व्ह्यॅल्यूवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. क्रिकेट हा धर्म आहे तर सचिन तेंडुलकर देव आहे अस म्हटलं जातं. मात्र, त्याला आपली शंभरावी सेंच्युरी अजूनही झळकावता आलेली नाही. धोनीनंतर तोच सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे. आता, पुन्हा एकदा जाहिरातविश्वावर आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी टीम इंडियाला विनिंग ट्रॅकवर परतावं लागलणार आहे.