झी २४ तास वेब टीम, केपटाऊन
केपटाऊन येथे झालेल्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट मॅच रंगतदार झाली मात्र यामध्ये द. आफ्रिकेने बाजी मारली. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व राहिलं ते दोन्ही टीमच्या बॉलर्सचं. दिवसभराच्या या खेळामध्ये एकुण २३ विकेट्स पडल्या. यांत ऑस्ट्रेलियाच्या एकुण १२ तर द. आफ्रिकेच्या ११ विकेट्सचा समावेश आहे. आतापर्यंत एका दिवशी सर्वाधिक २७ विकेट्सचा रेकॉर्ड आहे तो ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड टेस्टमध्ये.
टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 8 विकेट्स गमावून २१४ रन्सवर ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला सुरूवात झाली. कॅप्टन मायकल क्लार्कने एकहाती किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला २५० रन्सचा टप्पा पार करून दिला. आणि ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग आटोपली ती २८४ रन्सवर. प्रत्युत्तरादाखल द.आफ्रिकेच्या इनिंगची सावध सुरूवात झाली. लंच टाईमपर्यंत २ आऊट ४८ अशा भक्कम स्थितीत असणाऱ्या आफ्रिकन टीमला ऑसी ऑलराऊंडर वॉटसनने हाशिम आमला आणि कॅलिसच्या रूपात सलग दोन धक्के दिले. आणि सुरू झाली द. आफ्रिकेच्या इनिंगची पडझड. आफ्रिकन ओपनर रूडॉल्फ आणि ग्रॅमी स्मिथ वगळता एकाही आफ्रिकन बॅट्सनला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
एका बाजुने शेन वॉटसनच्या भेदक माऱ्यापुढे चाचपडणाऱ्या आफ्रिकन टीमला रायन हॅरीसने दुसऱ्या एंडकडून आफ्रिकेच्या मुसक्या आवळल्या. आणि द. आफ्रिकन टीम पहिल्या इनिंगमध्ये केवळ ९६ रन्सवरच गारद झाली. ऑस्ट्रेलियातर्फे वॉटसनने ५ तर हॅरीसने ४ विकेट्स घेतल्या. तब्बल १८८ रन्सची भक्कम आघाडी घेऊन मैदानात उतरलेले कांगारू आता किती मोठं टार्गेट द. आफ्रिकेपुढे ठेवणार याकडेच साऱ्यांच लक्ष होतं. पण प्रत्यक्षात झालं मात्र उलंट. वॉटसनच्या रूपात ऑस्ट्रेलियाला केवळ ४ रन्सवर पहिला तर पॉन्टिंगच्या रूपात ११ रन्सवर दुसरा धक्का बसला. मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करताना द.आफ्रिकन पेस बॅटरीने ऑसी टीमला सावरण्याची संधीच दिली नाही. मॉर्ने मॉर्केल, फिलांडर आणि स्टेन या त्रिकूटाच्या माऱ्यापुढे ऑसी बॅट्समन्सनी अक्षरश: लोटांगणच घातलं. आणि ऑस्ट्रेलियाची 9 आऊट 21 अशी दयनीय स्थिती झाली.
पीटर सीडल आणि नॅथन लेयॉन जोडीने अखेरच्या विकेटसाठी 26 रन्सची पार्टनरशिप करताना ऑस्ट्रेलियाला आतापर्यंतचा टेस्टमधील निचांकी ३७ रन्सचा स्कोर पार करून दिला. अखेर स्टेनने लेयॉनला आऊट करत ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग केवळ ९५ मिनिटांत १८ ओव्हर्समध्ये ४७ रन्सवर आटोपली. पॉन्टिंग, हसी आणि हॅडीन या कांगारूंना तर खातं खोलण्यातही अपयश आलं. वरनॉन फिलँडरने तर ऑसी टीमचं वस्त्रहरणंच केलं. त्याच्या भेदक माऱ्यापुढे ऑसी टीमची सळो की पळो स्थिती झाली. अखेर 236 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात आलेल्या द. आफ्रिकेच्या सेकंड इनिंगची आश्वासक सुरूवात झाली. ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम आमलाने जबाबदारीने खेळताना ऑसी फास्ट बॉलिंगचा यशस्वीपणे सामना करत द.आफ्रिकेला विजयी लक्ष्य गाठून दिलं.