www.24taas.com, बंगळुरु
आयपीएलच्या पाचव्या मोसमातील हिरो ठरला आहे तो, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर अजिंक्य रहाणे. त्यांने वादळी खेळी करताना नाबाद १०३ रन्स केवळ ६० बॉलमध्ये फटकावल्या. यात १२ फोर आणि ५ सिक्स लगावले. अजिंक्यच्या शतकामुळे १९५ची मजल राजस्थान रॉयल्सने मारली. मात्र, डॅनियल व्हिटोरीचा बंगळुरु संघ गारद झाला. बंगळुरुला १३६ रन्स करता आल्या.
पहिल्या शतकाचा मान अजिंक्य रहाणेने पटकावला. अजिंक्यच्या शतकाला ओवेश शहाच्या वादळी अर्धशतकाच्या मिळालेल्या साथीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला बंगळुरू पुढे १९६ रन्सचे आव्हान ठेवता आले. गोलंदाजांच्या तिखट माऱ्यापुढे बंगळुरूला हे आव्हान पेलवले नाही आणि राजस्थानने ६० रन्सनी विजय साकारला. या विजयासह राजस्थान गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व अजिंक्यने तो योग्य असल्याचे दाखवून दिले. कर्णधार राहुल द्रविडला (२५) मोठी खेळी साकारता आली नसली, तरी अजिंक्य आणि शहाने मात्र पैसा वसूल फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १२१ रन्सची भागीदारी रचली आणि ती देखील फक्त ४४ चेंडूंमध्ये. हे दोघेही बंगळुरूच्या गोलंदाजांवर तुटून पडले आणि त्यांना आपल्यापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले. अरविंदच्या १४ व्या षटकात तर अजिंक्यने तब्बल ६ चौकारांची अतिषबाजी करत २४ रन्स कुटल्या.
१९६ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यांचा डाव १३६ धावांत आटोपला. सिद्धार्थ त्रिवेदीने यावेळी २५ धावांत ४ बळी मिळवले, तर पंकज आणि अमित सिंग यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडले.