प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : केक सोबत आकर्षक कँडल पेटवून वाढदिवसाच्या (birtday candle) सेलिब्रेशनचा आनंद वाढवला जातो. मात्र, याच बर्थ डे कँडलने चार महिलांचा घात केला आहे. कँडल तयार करत असताना अचानक आग लागली. आगीत होरपळुन चार महिलांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यात (Dhule) ही धक्कादायक घटना घडली आहे.
धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावात एक भयानक दुर्घटना घडली. आगीत होरपळून चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जैताने गाव परिसरात शोककळा पसरली आहे.
चिखलीपाडा गावात वाढदिवसासाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्ती बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात मृत महिला काम करत होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने कारखान्यात आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केले. चारही बाजूने आगीने वेढा घातल्याने महिलांना बाहेर देखील पडता आले नाही.
आशाबाई भैया भागवत ( वय 34), नैनाबाई संजय माळी (वय 48), सिंधुबाई धडकु राजपूत अशी मृत महिलांची नावे आहेत. चौघी मृत महिलांपैकी एक ही अल्पवयीन तरुणी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेत संगीता प्रमोद चव्हाण 55 ते 70% भाजल्या आहेत. तर, निकिता सुरेश महाजन या 30% टक्के भाजल्या आहेत. त्याच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरु आहेत.
या सर्व महिला जैताने गावातील रहिवाशी आहेत. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. चौकशीत अजून नेमकी माहिती समोर येईल. या प्रकरणी एका संशयितला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही आरोपी पुन्हा धमक्या देत असल्याने मासेमारी करणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पोलीस स्टेशन समोर अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातील इसलापुर पोलीस स्टेशन समोर ही घटना घडली. किनवट तालुक्यातील भिशी येथील विकास कायपलवाड हा मासेमारी करतो. भिशी येथील तलावातून मासेमारी करण्यास गावातील काही जणांनी विरोध केला होता. याबाबत तक्रार दिल्या नंतर इसलापुर पोलीसांनी आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. पण तरीही आरोपी त्रास देत असल्याने अचानक विकास कायपलवाड याने पोलीस स्टेशन समोर येऊन अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. तात्काळ त्याला प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. कायपलवाड हे 60 टक्के भाजले गेले असून त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.