Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दर दिवशी राज्यात वेगवेगळे राजकीय रंग पाहायला मिळत आहेत. मातब्बर नेत्यांनी त्यांच्या परिनं मतदारांची मनं आणि मतं जिंकण्याचा प्रयत्न सुरु ठेवला असून, त्यामध्ये कार्यकर्तेही कुठं कमी पडताना दिसत नाहीयेत. त्यातच सोमवारचा दिवस आणखी एका कारणानं राजकीय घडामोडींना वेगळं वळण देणारा ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 6 मे 2024, सोमवार हा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांनी भरलेले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे आता नाशिक- दिंडोरीतून कोण माघार घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे विजय करंजकर, राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे निवृत्ती अरेइंगळे आणि भाजपकडून अनिल जाधव तर अपक्ष म्हणून लढणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांना समजावण्याचा प्रयत्न सर्व पातळीवरून केला जात आहे. या मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे, तर मविआकडून राजाभाऊ वाजे यांची थेट लढत करण्याचा प्रयत्न पक्षांकडून सुरु आहे.
दुसऱ्या बाजूला दिंडोरी मतदार संघातून महायुतीच्या भारती पवार आणि मविआकडून भास्कर भगरे रिंगणात आहेत. इथं माकपचे जे पी गावित यांनीही अर्ज भरून मविआसोबत बंडखोरी केली होती. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांना त्यांची माघारी जाहीर केली. ज्यानंतर सोमवारी ते यासाठीची औपचारिकता पूर्ण करतील.