close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोदी सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांंना मंत्रीपद, तर वरिष्ठांना बढतीची शक्यता

| May 24, 2019, 15:56 PM IST
1/10

भाजपला मिळालेल्या प्रंचड मोठ्या विजयानंतर आता मोदी सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत देशात चर्चा सुरु झाली आहे. पुढच्या आ़ठवड्यात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आणखी कोणाकोणाला स्थान मिळतं हे पाहणं देखील उत्सूकतेचं ठरणार आहे. गांधीनगर मतदारसंघातून विजयी झालेले भाजप  अध्यक्ष अमित शाह यांच्या नावाची यामध्ये जोरदार चर्चा आहे. अमित शहा यांना महत्त्वाचा विभाग मिळू शकतो. सोबत अनेक मंत्र्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी मंत्रीपद मिळू शकतं.

2/10

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवणाऱ्या अमित शहा हे मोदी सरकारच्या सुरक्षा संबंधित मंत्रीमंडळ समितीत (CCS) सहभागी होऊ शकतात. सीसीएसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या शिवाय संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि वित्त विभागाचे चार मंत्री असतात. यापैकी अमित शहा यांना महत्त्वाचं पद दिलं जावू शकतं.

3/10

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना अमित शहा हे गृहमंत्री होते. त्यामुळे अमित शहा यांना केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळू शकतं. पण मोदी सरकारमध्ये आधीच असलेले गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील लखनऊमधून विजयी झाले आहेत. ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील एक महत्त्वाचे नेते आहे. 

4/10

राफेल व्यवहारांवरुन आरोप होत असताना हे प्रकरण योग्य प्रकारे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण यांना पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालय मिळू शकतं. 

5/10

दुसरीकडे सरकारचे संकटमोचक असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा एकदा महत्त्वाचं मंत्रालय मिळू शकतं.  

6/10

अरुण जेटलींच्या प्रकृतीबाबत चिंता

अरुण जेटलींच्या प्रकृतीबाबत चिंता

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता आहे. त्यांना गुरुवारी दिल्लीच्या एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. ते भाजपच्या मुख्यालयात झालेल्या विजय उत्सवात देखील सहभागी होऊ शकले नव्हते. पुढच्या महिन्यात येणाऱ्या आर्थिक आव्हानांना पाहता पक्षात याला तोंड कसे द्यावे याबाबत चिंता आहे. त्यामुळे अर्थमंत्री कोणाला करायचे याबाबत देखील चिंता आहे. जेटली हे जवळपास ३ आठवड्यांपासून आराम करत आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी अर्थखातं योग्य प्रकारे सांभाळलं. यावर्षी २२ जानेवारीला त्यांच्यावर अमेरिकेत महत्त्वाची सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांना बजेट देखील सादर करता आलं नव्हतं. पियुष गोयल यांना ती जबाबदारी देण्यात आली होती.

7/10

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या राज्यसभेच्या देखील सदस्या नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा हे मंत्री बनवण्यात येईल का याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहे.

8/10

वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीमधून यंदा राहुल गांधी यांना पराभूत केलं. त्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे त्यांना देखील महत्त्वाचं मंत्रीपद दिलं जावू शकतं. 

9/10

व्ही. के सिंह यांना देखील चांगलं मंत्रीपद द्यावं लागेल. कारण यंदा देखील त्यांनी गाजियाबादमधून मोठा विजय मिळवला आहे.  

10/10

कायदा मंत्री रविशंकर प्रसाद हे राज्यसभेचे सदस्य आहेत. पण ते आता लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील महत्त्वाचं मंत्रीपद मिळालं होतं.