IND Vs AUS- इंदूर कसोटीत टीम इंडियाची शरणागती, ही आहेत पराभवाची 5 कारणं

Cricket : भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवाबरोबरच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (World Test Championship) प्रवेशची प्रतीक्षाही लांबवली आहे. ऑस्ट्रेलियासाठी रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजचं अडकले. इंदूर कसोटीत (Indore Test) पहिल्या इनिंगमध्ये 109 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 163 धावांवर टीम इंडिया (Team India) ऑलआऊट झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये एकट्या नॅथन लिओनने 8 विकेट घेत टीम इंडियाला सपशेल लोळवलं.

Mar 03, 2023, 15:48 PM IST
1/5

सामन्याच्या पहिल्या सत्रात 7 विकेट

इंदूरमधल्या होळकर स्टेडिअमची खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ देणारी होती. अशात टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण ऑस्ट्रेलियासाठी विणलेल्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडिया स्वत:च अडकली. पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात टीम इंडियाने 7 विकेट गमावले आणि संपूर्ण टीम अवघ्या 109 धावांवर आटोपली.

2/5

ऑस्ट्रेलियाला लवकर गुंडाळण्यात अपयश

पहिल्या इनिंगमध्ये स्वस्तात पॅव्हेलिअनमध्ये परतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण टीम इंडियात दिग्गज फिरकी गोलंदाज असतानाही ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियाला 125 ते 140 धावांदरम्यान गुंडाळलं असतं तर भारताच्या विजयाची संधी वाढली असती. पण ऑस्ट्रेलिायने 197 धावांपर्यंत मजल मारली.

3/5

पहिल्या इनिंगमध्ये DRS गमावले

सामन्याच्या एका इनिंगमध्ये प्रत्येक संघाला 3 DRS मिळतात. पण तीनही DRS टीम इंडियाने पहिल्या सत्रातच गमावले. तीनही रिव्ह्यू भारताच्या विरोधात गेले. त्यामुळे भारताकडे एकही रिव्ह्यू शिलल्क राहिला नाही. आर अश्विनच्या चेंडूवर मार्नस लाबुशेन आऊट असतानाही टीम इंडियाने DRS घेतला नाही. पण रिप्लेमध्ये लाबूशेन आऊट असल्याचं स्पष्ट झालं. 

4/5

रोहित-विराटचा फ्लॉप शो

पहिल्या इनिंगमधल्या फ्लॉप शोनंतर दुसऱ्या इनिंगमध्येही टीम इंडियाच्या फलंदाजीत सुधार झाला नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा फेल झाले. या इनिंगमध्ये 200 ते 250 धावा केल्या असत्या तर भारताला विजयाची संधी होती. पण चेतेश्वर पुजारा सोडल्यास कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी फ्लॉप शो केला. संघाला गरज असताना दिग्गज फलंदाज ढेपाळले.

5/5

तळाचे फलंदाजही गडगडले

दिग्गज फलंदाज फेल ठरत असताना तळाचे फलंदाजही मोठी कामगिरी करु शकले नाहीत. आर अश्विन, केएस भरत, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्याकडून मोठी अपेक्षा असताना तेही गडगडले. शेवटी विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर केवळ 76 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. जे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केलं.