Photos: ...अन् संतापलेल्या आमित शाहांनी माझ्या दिशेने पेपर फेकले; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

Famous Actor Intraction With Amit Shah: या अभिनेत्याने अमित शाहांबरोबर झालेली भेट आणि या भेटीतील चर्चेबद्दल जाहीर कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. या भेटीत आपण आपली इच्छा बोलून दाखवली असता अमित शाह यांनी कशापद्धतीने प्रतिसाद दिला हे या अभिनेत्याने सांगितलं. नेमकं तो काय म्हणाला पाहूयात...

Aug 29, 2024, 11:20 AM IST
1/8

AmitShah

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भारतीय जनता पार्टीमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या भेटीचा हा किस्सा अभिनेत्यानेच एका जाहीर कार्यक्रमात सांगितला. तो नेमकं काय म्हणाला आहे जाणून घ्या...

2/8

AmitShah

भारतामध्ये मनोरंजन, राजकारण आणि क्रिकेट या तीन क्षेत्रांबद्दल लोकांना बोलायला प्रचंड आवडतं. विशेष म्हणजे या तिन्ही क्षेत्रांमधील लोक एकमेकांच्या क्षेत्रात सहज ये-जा करत असतात. अशाचप्रकारे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एका दिग्गज अभिनेत्याचा नेता झाला आणि त्याच्या खांद्यावर थेट देशातील सर्वात महत्त्वाच्या मंत्रालयापैकी एकाची जबाबदारी सोपवण्यात आली. याच नेत्याने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्त्वाचे नेते असलेल्या अमित शाहांबरोबर झालेला एक रंजक संवाद नुकताच सांगितला आहे. त्यावरच नजर टाकूयात...  

3/8

AmitShah

पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी अनेक जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. असाच एक नवा चेहरा देशाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदी विराजमान झाला. या चेहऱ्याचं नाव आहे सुरेश गोपी!मंत्रीपदाची जबाबदारी पार पडातानाच आपल्याला चित्रपटही करायचे आहेत असं गोपी यांचं म्हणणं आहे. मी चित्रपट करायचं थांबवलं तर जगू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

4/8

AmitShah

दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपाला यश मिळत नाही असा इतिहास आहे. मात्र याला अपवाद ठरलेत ते सुरेश गोपी! सुरेश गोपी हे लोकांमधून निवडून आलेले भाजपाचे केरळमधील पहिले खासदार ठरले आङेत. त्रिसूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्याच्याकडे मोदी 3.0 सरकारमधील पर्यटन मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचाही कारभार सोपवण्यात आला आहे.  

5/8

AmitShah

आठवडाभरापूर्वी तिरुवनंतपूरम येथे केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात सुरेश गोपी सहभागी झाले होते. त्यावेळी दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी, "चित्रपट हे माझं पॅशन आहे. माझ्या आयुष्यात चित्रपट नसतील, मी चित्रपट सोडले तर मी मरुन जाईन. मी ओट्टाककोंबन चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मागितली आहे. अद्याप मला परवानगी मिळालेली नाही. मात्र मी 6 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचं शुटींग सुरु करेन," असा विश्वास बोलून दाखवला.  

6/8

AmitShah

"मंत्रालयासंदर्भातील कामं करण्यासाठी मी माझ्याबरोबर 3 ते 4 जणांना सेटवर घेऊन जाणार आहे. तिथे मी त्यांना कॅराव्हॅन देईन. त्यांनी मला या अटीवर सोडलं तर मोठा दिलासा मिळेले. त्यामुळे मला माझ्या त्रिसूर मतदारसंघातील लोकांसाठी अधिक वेळ मिळेल. मला व्यक्ती म्हणून केंद्रात मंत्रीपद मिळालेलं नाही. ज्या लोकांनी भाजपासाठी मतदान केलं आहे त्यांच्यासाठी हे पद देण्यात आलं आहे," असं सुरेश गोपी म्हणाले.

7/8

AmitShah

सुरेश गोपी यांनी त्रिसूरमधून निडवणूक लढवताना भाजपाने, "त्रिसूरचा केंद्रीय मंत्री, मोदींची गॅरंटी" या धोरणासहीत प्रचार केला होता. त्यामुळेच सत्तेत आल्यानंतर सुरेश गोपी यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं. मंत्रीपद मिळाल्यानंतरही सुरेश गोपी यांनी "मला मंत्रीपद नकोय. मी तसं पक्षाही कळवलं आहे. मला मंत्रिमंडळामध्ये पद मिळवण्यात रस नाही. मला वाटतं मला लवकरच या जबाबदारीतून मुक्त करतील. त्रिसूरच्या लोकांना हे माहिती आहे. मी खासदार म्हणून चांगलं काम करु शकतो. मला चित्रपटांमध्ये काम करायचं आहे. पण पक्षाला काय तो निर्णय घेऊ द्या," असं म्हटलं होतं.   

8/8

AmitShah

अमित शाहांना आपण आपल्या मनातील इच्छा सांगितल्यानंतर ते थोडे संतापलेले दिसल्याचा खुलासा सुरेश गोपी यांनी केला आहे. "मी 20 ते 22 चित्रपटांमध्ये काम करण्यास संमती दिलेली आहे. मला जेव्हा (केंद्रीय गृहमंत्री) अमित शाहांनी किती चित्रपटांचं चित्रिकरण बाकी आहे. असं विचारलं तेव्हा मी त्यांना किमान 20 ते 22 चित्रपटांमध्ये काम करेन असा शब्द दिला आहे, असं सांगितलं. ते ऐकून त्यांनी मी त्याच्याकडे दिलेले कागद माझ्या दिशेने फेकले. मी कायमच माझ्या नेत्याच्या आदेशाचं पालन करेन. मात्र चित्रपट माझं पॅशन असून ते केले नाहीत तर मी मरेन," असं सुरेश गोपी आपल्या भाषणात म्हणाले.