GANESHOTSAV 2020 : पाहा, पारंपरिक पद्धतीने साकारला जातोय बाप्पा...

Aug 10, 2020, 14:32 PM IST
1/8

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग यंदाच्या वर्षी काहीशी कमी दिसत आहे. कोरोना व्हायरसचे हे थेट परिणाम आहेत. जागतिक महामारी म्हणून सर्वांसमोर आलेलं हे आव्हान यंदाच्या वर्षी सण- उत्सवांवरही परिणाम करत आहे. पण, त्यातही काही मंडळी मात्र याच उत्सवाची चाहूल तितक्यातच सकारात्मकतेनं आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. 

2/8

ही मंडळी म्हणजे गणेश चित्रशाळांमध्ये रमणारे मूर्तीकार. साधारण महिन्याभरापासून कलाकारांचे हे हात मूर्ती घडवण्याच्या कामांमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये लॉकडाऊनच्या काळातही मूर्तीकारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. पण, त्यावर तोडगा काढत या मूर्तीकारांनी फायदेशीर असे मार्ग काढले आहेत. 

3/8

असेच एक मूर्तीकार म्हणजे प्रकाश तांबे. मुंबईपासून काहीशा अंतरावर असणाऱ्या पनवेलच्या नजीक असणाऱ्या तारा या गावात असणाऱ्या युसूफ मेहेर अली सेंटर येथील पॉटरी विभागात प्रकाश तांबे आणि काही स्थानिक गावकरी मिळून लाल (टेराकोटा) मातीपासून या गणेश मूर्ती साकारण्यात येतात. 

4/8

मुंबईमधील धारावी येथून ही माती या चित्रशाळेमध्ये पोहोचते. ज्यानंतर ती माती मळण्यापासून त्यावर विविध प्रक्रिया करेपर्यंत आणि मूर्ती साचातून काढून त्याचे सांधे जोडण्यापासून ते अगदी पॉलिश, फिनिशिंग करेपर्यंतची ही कामं डोळे दीपवून टाकणारी आहेत. 

5/8

प्रकाश तांबे हेसुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांसह अतिशय समर्पकपणे या कामात स्वत:ला झोकून देत आहेत. मागील पाच- सहा वर्षांपासून ते गणेशमूर्ती सुकवण्यासाठी या चित्रशाळेमध्ये लाकडाच्या शेकोटीचा वापर केला जातो. ज्याच्या उबेमुळं मूर्ती सुकतात, पुढं मूर्ती किमान सुकल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया केली जाते. 

6/8

रंगकामासाठीसुद्धा या चित्रशाळेमध्ये नैसर्गिक रंगाचाच मोठ्या प्रमाणावर वापर केला त्याचीच काही उदाहरणं त्यांच्या चित्रशाळेमध्ये भेट दिल्यानंतर पाहायला मिळतात. 

7/8

सहा इंचांपासूनच्या गणेश मूर्ती या चित्रशाळेमध्ये साकारल्या जात असून, ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तीची उंची आणि बैठक निर्धारित केली जाते. अतिशय कलात्मक पद्धतीनं हा बाप्पा सध्या तारा येथील या चित्रशाळेमध्ये साकारला जात आहे. पण, यंदाच्या वर्शी मागणी असूनही लॉकडानच्या संकटामुळं मूर्तीकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना लागत आहे. 

8/8

उत्सवाचा खरा आनंद आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या कलाकारांना गरज आहे ती म्हणजे प्रतिसादाची, शासनानं काही प्रमाणात लक्ष देण्याची. चला तर मग, या कलाकारांसाठी निसर्गाच्या कलानं घेत यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित आणि पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा करुया. घरात राहून, सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाला मिटवूया. (सर्व छायाचित्रं- स्वप्नील नाखवा)