Ashadhi Ekadashi Recipe: एकादशी...अन् दुप्पट खाशी! आषाढी एकादशीला बनवा चविष्ट अन् हटके उपवासाचे पदार्थ

Ashadhi Ekadashi Fast Recipe: मराठी एक प्रचलित म्हण आहे एकादशी...अन् दुप्पट खाशी, यंदा आषाढी एकादशीला नेहमी पेक्षा हटके आणि चविष्ट असे उपवासाचे पदार्थ बनवा पोटासोबत मनही तृप्त होईल. 

| Jul 16, 2024, 17:36 PM IST
1/7

उपवासाचे घावन

साहित्य – 1 वाटी साबुदाणे, 2 हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, दाण्याचे कूट, जिरे, चवीपुरते मीठ, तूप कृती –  साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी मिक्सरमधून वाटून करुन घ्या. आता त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचे कूट, मीठ सर्व मिक्स करा. नेहमीच्या घावनाप्रमाणेच हे सारण सरसरीत करावे. नॉनस्टिक तव्याला तूप लावा आणि घावन करुन घ्या. खोबऱ्याच्या चटणीहे उत्तम लागतात. शिवाय उपवासाची बटाटा भाजीही तुम्ही करु शकता. 

2/7

रताळ्याच्या गोड फोडी

साहित्य – 4 ते 5 मध्यम आकाराचे रताळे, दिड वाटी गूळ किंवा साखर कृती –  रताळी स्वच्छ धुवून, त्याच्या गोलाकार चकत्या करा. त्यानंतर एक कढई गॅसवर तापायला ठेवा. कढई तापली की त्यात तूप घाला. तूप तापल्यानंतर त्यात रताळ्याच्या फोडी टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. फोडी थोड्या मऊ झाल्या की त्यात गूळ आणि साखर घाला. काही मिनिटातच साखरेचा किंवा गुळाचा पाक होतो. आता त्या पाकात फोडी चांगल्या शिजून घ्या. 

3/7

राजगिरा थालीपीठ

साहित्य – 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी राजगिऱ्याचे पीठ, 2 हिरव्या मिरच्या (तिखट तुमच्या आवडीप्रमाणे), मीठ, साखर, तूप कृती – उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर, थोडेसे तूप घालून मीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्यानंतर त्याचे गोळे करावेत. बटर पेपरला तूप लावा आणि त्यावर हे थालिपीठाप्रमाणे थापा आणि मध्ये एक छिद्र पाडा. तवा मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर तूप सोडावे आणि वरून थालिपीठ लावावे. मंद गॅसवर हे थालिपीठ खमंग भाजा. तयार झाल्यावर दही अथवा शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणीसह छान लागतात. 

4/7

उपवासाचा बटाटावडा

साहित्य – उकडलेले बटाटे, 4-5 हिरव्या मिरच्या, लाल तिखट, आल्याचे तुकडे, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ पाव वाटी, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल अथवा तूप कृती – आधी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात हिरवी मिरची पेस्ट, आल्याची पेस्ट अथवा तुकडे आवडीनुसार मिक्स करा. तेलावर हे परतून बटाट्यामध्ये घाला आणि तुम्हाला हवं असेल तर दाण्याचे कूटही घालू शकता. त्यात मीठ घाला. या मिश्रणाचा वड्याचा आकार करून घ्यावा. वरी पीठ, साबुदाणा पीठ, मीठ, तिखट आणि सोडा मिक्स करून पाणी घालून सारण करा. आता गोळा यात बुडवून वडे तळावेत. खोबऱ्याच्या चटणीसह हे वडे चविष्ट लागतात.

5/7

उपवासाचे रगडा पॅटीस

साहित्य – 1 वाटी शेंगदाणे, 1 मोठा चमचा साजूक तूप, जिरे, ओले खोबरे, आले – मिरची पेस्ट, आमसूल, चवीनुसार मीठ आणि गूळ, तिखट, उकडलेले बटाटे कृती – शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उपसून साधारण त्याला 5 शिट्ट्या कुकरमध्ये द्या. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या. कढईत तूप तापवा त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या. याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या. शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या. पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक वाढवा. 

6/7

उपवासाचा दहिवडा

साहित्य : 4 बटाटा, दीड वाटी उपवासाची भाजणी, राजगिरा आणि शिंगाडा पीठ दाणेकूट एक कप, दही मोठ्या तीन वाट्या, हिरव्या मिरच्या 2/3, जिरे एक चिमूट, आले वाटण एक चहाचा चमचा, तिखट, मीठ, चिरलेली थोडी कोथिंबीर, तूप तळणीसाठी कृती : एका परातीत उकडून साले काढलेले बटाटे, दाणे कूट, सर्व पीठे, तिखट, मीठ घ्या. सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा. कढईत तूप गरम करा. हे गोळे लालसर रंगावर तळून घ्या. नंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्या. त्यात मिरची, आले वाटण, मीठ घाला. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या. यात तळलेले गोळे टाका. वरून चिरलेली कोथिंबीर पेरा आवडत असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर खा.  

7/7

इंदुरी उपवासाचे चॅट

साहित्य – 1 वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ, 2 चमचे तूप, साबुदाणा दीड वाटी, साखर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर. कृती – वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करा आणि त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी. कढईत तूप घालून साबुदाणा टाकावा. मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे. कोथिंबीर घालावी. प्रथम शिंगाड्याची शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूट मीठ, तयार साबुदाणा, बटाटा सली, ओले खोबरे, काजू, बेदाणे, 2 चमचे दही घालावे. वरून कोथिंबीर व चाट मसाला भुरभुरून इंदुरी उपवासाचे चॅट सर्व्ह करा.