World cup 2019 : पहिल्याच सामन्यात 'या' कारणामुळे धोनीचे ग्लोव्ह्ज ठरले चर्चेचा विषय

Jun 06, 2019, 12:09 PM IST
1/6

इंग्लंडमध्ये काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या क्रिकेट विश्वचषकात अखेर भारतीय संघाची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात खऱ्या अर्थाने संघाला एक सकारात्मक दिशा देऊन गेली यात शंका नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नमवत भारतीय क्रिकेट संघाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. विजयी पताका उंचावणाऱ्या या सामन्यात काही खास क्षणही पाहायला मिळाले. पण त्यात चर्चेत राहिला तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. 

2/6

माही नेहमीच त्याच्या अफलातून खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतो. या वेळी त्याने डोळ्यांचं पारणं फेडलं पण, ते एका वेगळ्या मार्गाने. भारतीय सैन्यदलाप्रती असणारी धोनीची ओढ कोणापासूनही लपलेली नाही. देशसंरक्षणासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा त्याला अपरंपार अभिमान आहे. 

3/6

आपला देश आणि सैन्याविषयी असणारी हीच आदराची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून त्याने 'बलिदान' हे चिन्हं असणारे ग्लोव्ह्ज घातले होते. सोशल मीडियावर त्याच्या हातातील ते हँडग्लोव्ह्ज लगेचच लक्ष वेधून गेले. 

4/6

ग्लोव्ह्जवर असणारं आणि शौर्याचं प्रतिक असणारं 'बलिदान' हे चिन्हंही अगदी स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे धोनीचंही अनेकांनीच कौतुक केलं. पॅरा स्पेशल फोर्समध्ये काम केलेल्यांनाच 'बलिदान'चं हे चिन्ह वापरण्याची परवानगी असते. धोनीला २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून गौरवण्यात आलं होतं. 

5/6

सैन्यदलाशी संबंधीत हे चिन्ह पहिल्यांदाच वापरात आणण्याची ही धोनीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही टोपीपासून ते मोबाईलच्या कव्हरपर्यंत अनेकदा त्याने या चिन्हाला पसंती दिली होती. 

6/6

भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू होण्याची इच्छा असल्याचं धोनीने अनेकदा सांगितलं होतं. क्रिकेटमध्ये त्याच्या कर्तृत्वाची उंची पाहता भारतीय लष्कराकडून २०११ मध्ये त्याला मानाचं असं लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आलं होतं. ज्यानंतर तो  106 Para TA च्या सेवेत होता. मुख्य म्हणजे त्याने पॅरा बेसिक प्रशिक्षणही पूर्ण केलं होतं. शिवाय, पाचवेळा पॅरा जम्प मारत त्याने पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.  माहीचा हा एकंदर अंदाज पाहता खरंच क्रीडारसिकांमध्ये असणारा त्याच्याविषयीचा आदर वाढला असणार यात वाद नाही.