मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या सहा शिलेदारांचा शपथविधी, कोणती खाती मिळणार?

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात महाराष्ट्राच्या सहा मत्र्यांचा समावेश आहेत. यात भाजपचे चार, तर शिंदे गटाच्या एका खासदाराचा समावेश आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात 30 इतर कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

| Jun 09, 2024, 21:58 PM IST
1/7

महाराष्ट्रातील सहा मंत्री

महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपद मिळालं आहे. यात भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपद मिळालंय. प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत. तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय.   

2/7

नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. Infrastructure man म्हणून त्यांची ओळख आहे. युती सरकारच्या काळात मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई उड्डाण पुल वेगाने बनवले. राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या जवळ असलेले नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विकासाचा महामेरू, विकसाचा अग्रगणी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. खासदार झाल्यापासून त्यांनी नागपूरचा चेहरा मोहरा बदलला. नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आलेत.

3/7

पियुष गोयल

पियुष गोयल यांचा जन्म 13 जून 1964 साली मुंबईत झाला. त्यांचे वडील वेद प्रकाश गोयल हे माजी केंद्रीय मंत्री होते. तर त्यांच्या आईचे नाव चंद्रकांता गोयल असून त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सलग तीन वेळा सदस्य होत्या.  पियुष गोयल हे लोकसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी राज्यसभेचे सदस्य होते. 2017 ते 2019 या काळात त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय ही दोन खाती त्यांच्याकडे होती. 2018 आणि 19 ला त्यांच्याकडे अर्थ आणि कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता. 2014 ते 17 या कालखंडात त्यांच्याकडे विद्युत, कोळसा आणि नवीकरणीय ऊर्जा अशी मंत्रालय त्यांनी सांभाळली आहेत. पियुष गोयल यांच्या 2018 ते 19 या कालखंडात भारतीय रेल्वेने सर्वोत्तम सुरक्षा रेकॉर्ड मिळवला आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकडून त्यांनी यंदा विजय मिळवला.

4/7

प्रतापराव जाधव

प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर इथं झाला. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. मेहकर तालुक्यातूनच राजकारणाला सुरुवात झाली 1995 मध्ये पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले, त्यानंतर 1999 मध्ये दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले तर 2004 तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला. 2024 मध्ये बुलडाणा  मतदारसंघातून त्यांनी थेट लोकसभा निवडणूक जिंकली.  शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांनी आता केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलीय. 

5/7

रक्षा खडसे

भाजपाच्या युवा नेत्या रक्षा खडसे 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. कोथळी गावातून सरपंच पद आणि नंतर जिल्हा परिषद सदस्या पासून राजकारणात त्यांनी सुरुवात केली. सर्वात तरुण सदस्य (26 वर्ष) म्हणून खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. 2019 मध्ये साडेतीन लाख मतांनी त्यांनी मनीष जैन यांचा पराभव केला होता. तिसऱ्यांदा खासदार होण्याचा बहुमान त्यांनी मिळवलाय. यंदाही रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून आल्यात.

6/7

रामदास आठवले

राजा ढाले या नेत्यांशी झाला आणि ते दलित चळवळीत सक्रिय झाले. रामदास आठवले हे दलित पॅंथर संघटनेचे कार्यकर्ते होते, याच चळवळीतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 10 एप्रिल 1978 ला भारतीय दलित पॅंथर ची स्थापना झाली. रामदास आठवले त्या संघटनेचे प्रमुख संघटक याच काळात त्यांनी दलित पॅंथर संपूर्ण देशभर पसरवली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात रामदास आठवले हे अग्रस्थानी होते. 1999 ला ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून संदिपान थोरात या सलग सात वेळा खासदार असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून जिंकले. 5 जुलै 2016 रोजी त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचे खात होतं.

7/7

मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळ हे वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. 1996 मध्ये त्यांनी भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2006 मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे बंधू दिवंगत नगरसेवक सुबराव कदम यांच्या पत्नी सुशीला कदम यांचा पराभव करून जायंट किलर ठरले.  स्थायी समिती अध्यक्ष आणि नंतर महापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.  2024 लोकसभा निवडणुकीत, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाची मर्जी संपादन करण्यात यश. पुण्यातून लोकसभेची उमेदवारी आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत खासदार म्हणून दिल्लीत पोहोचलेत.