Republic Day 2024 : दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा; राज्याच्या चित्ररथातून शिवरायांना मानाचा मुजरा!

प्रजासत्ताक निमित्त 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ..!

Jan 26, 2024, 12:42 PM IST
1/8

26 जानेवारी 2024 रोजी दिल्लीत झालेल्या चित्ररथ पथ संचलनात 26 राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांना 'विकसित भारत' व 'भारत लोकशाहीची जननी' या दोन संकल्पनांवर आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाच्या वतीने सादर करण्यात आले.  

2/8

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला गेला.

3/8

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त, या विषयास अनुसरून 'लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर संरक्षण मंत्रालयास चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले आहे.

4/8

दिल्लीत झालेल्या पथ संचलनासाठी 30 चित्ररथ प्रर्दशित झाले. यामध्ये 16 राज्य, 07 केंद्रशासित प्रदेश व उर्वरित विविध केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश असणार आहे. देशभरातून एकूण 30 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती, विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमासाठी करण्यात आली. दिल्ली केंट राष्ट्रीय रंगशाला परिसरात शुभ अ‍ॅड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात आली आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात आले होते.   

5/8

रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या 'धन्य शिवराय... धन्य महाराष्ट्र !' गीताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर केला गेला. भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.  

6/8

या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंत दाखवण्यात आले. चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा फिरवतांना दिसतात व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसत आहेत.   

7/8

त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत. तर मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवण्यात आला आहे. या दरबारात काही महिला आपल्या प्रश्नांसाठी उपस्थित असल्याचे ही दाखविण्यात आले आहे.   

8/8

चित्ररथाच्या मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. तर शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती सादर करण्यात आली आहे.