ना सचिन, ना धोनी, ना विराट… आजपर्यंत कुणी मोडू शकलेला नाही गावसकरांचे हे 5 रेकॉर्ड्स!

भारताचे माजी सलामीवीर आणि कर्णधार सुनील गावसकर हे आज 72 वर्षांचे झालेत. अत्यंत मजबूत फलंदाजीच्या तंत्रामुळे त्यांना 'लिटल मास्टर' म्हणून ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. जे त्यांच्या निवृत्तीनंतरही अतूट आहेत. जाणून घेऊयात गावसकर यांचे 5 मोठे रेकॉर्ड

Jul 10, 2024, 13:55 PM IST
1/7

इतिहासातील सर्वात आघाडीचे फलंदाज

सुनील गावसकर हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले फलंदाज आहेत. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वात आघाडीचे फलंदाज म्हणून त्यांची खास ओळख आहे. 125 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी 51.12 धावांच्या सरासरीने तब्बल 10,122 धावा काढल्या आहेत. 

2/7

लिटिल मास्टर म्हणून प्रसिद्ध:

जगातील महान फलंदाजांपैकी सुनील गावसकर हे एक आहेत. त्यांना लिटिल मास्टर म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. 10 हजारांहून अधिक धावा करणारे ते एकमेव खेळाडू आहेत. 

3/7

पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा :

सुनील गावसकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात गावसकर यांनी 65 आणि 67 धावा करत त्यांनी भारतीय संघाला 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या मालिकेतील 5 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 774 धावा केल्या. संपूर्ण मालिकेत गावसकर यांनी 4 शतके आणि 3 अर्धशतके केली. आजपर्यंत जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला हा विक्रम मोडता आलेला नाही.

4/7

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके

सुनील गावसकर यांच्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजचा संघ जगातील सर्वात बलाढ्य संघ होता. वेस्ट इंडिजविरुद्ध मायकेल होल्डिंग, जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स आणि माल्कम मार्शल यांच्या विरुद्ध 27 कसोटी सामन्यांमध्ये सुनील गावसकर यांनी 13 शतके झळकावली. वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजाने झळकावलेल्या शतकांची ही सर्वाधिक संख्या आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 65.45 च्या सरासरीने गावसकर यांनी 2,749 धावा केल्या. सुनील गावसकर यांचा हा विक्रमही आजतागायत मोडता आलेला नाही.

5/7

कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक शतके:

कसोटी कारकिर्दीत गावसकर यांनी 34 शतके झळकावली. यापैकी त्यांनी कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 4 शतके झळकावली. या यादीत सचिन तेंडुलकर 3 शतकांसह दुसऱ्या तर मोहम्मद अझरुद्दीन आणि विराट कोहली प्रत्येकी 2 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

6/7

कसोटीच्या दोन्ही डावात 3 वेळा शतक:

सुनील गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत 3 वेळा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावले. गावसकर यांनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत 124 आणि 220 धावा केल्या. 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये त्यांनी 111 आणि 137 धावांची खेळी खेळली. एका महिन्यानंतर, गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता कसोटीत 107 आणि 182 धावांची नाबाद खेळी केली. 

7/7

कसोटी सलामीवीर म्हणून खास ओळख:

कसोटीत फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी 186 डावांमध्ये 8,511 धावा केल्या आहेत. जे जगातील सर्वोच्च आहेत. इंग्लंडचा ग्रॅहम गूच 7,598 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.