कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापूरी चप्पलने नाही; चंद्रकांत पाटील यांचे मुश्रीफांना प्रत्युत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Updated: Sep 20, 2021, 12:15 PM IST
 कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापूरी चप्पलने नाही; चंद्रकांत पाटील यांचे मुश्रीफांना प्रत्युत्तर title=

पुणे : कायद्याची लढाई कायद्याने लढायची असते, कोल्हापूरी चप्पलने लढाईची नसते. ED ला फेस करता करता तोंडाला फेस येईल.असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे.

'तुमच्या कारखान्यांमध्ये 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आले. त्या कंपन्या कुठे आहेत. कोलकातामधील कंपन्यांनी संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर बोला? त्यावर तुम्ही बोलतच नाही आहात. मला मुश्रीफ साहेबांना आवाहन करायचं आहे की, पॅनिक होऊन काही होत नसतं. ' असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप पश्चिम महाराष्ट्रात कमी झाली असा मुश्रीफांनी म्हटले होते. त्यांनंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये भाजपच्या खासदार, आमदार, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिकांबाबत पाटील यांनी आठवण करून दिली. तसेच मुश्रीफ यांना माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोप लागणार नसेल तर, त्यांनी ते खुशाल घ्यावे. माझी त्याला परवानगी असल्याचेही पाटील यांनी यावेळी म्हटले. 

'किरिट सोमय्यांची माहिती खोटी असेल तर तसं स्पष्ट करा. कायद्याची लढाई कायद्याने लढा. हे कोल्हापूरी पायतान रे वेगैरेच्या धमक्या देऊ नका. मुश्रीफ यांनी वकील चांगला नेमावा. ते 98 कोटी रुपये आले कुठून हे सांगावे.' असे पाटील यांनी पुन्हा म्हटले. 

'मी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना म्हटले होते की, मा. उद्धवजी गृहखाते हे राष्ट्रवादीकडे देऊ नका. हे तुमच्या घरावर कॅमेरे लावतील. सध्या चाललेला पैशांचा गैरव्यवहार सर्वात जास्त गृहखात्याच्या माध्यमातून होत आहे.' असा घणाघाती आरोपही पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षावर केला.