Brahma Kamal Vastu Tips:हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णुसह देवी लक्ष्मीलाही कमळाचे फुल अत्यंत प्रिय आहे. कमळाची फुलं अनेक प्रकारची असतात. मात्र, त्यातील सर्वात दुर्मिळ आणि शुभ फुल असते म्हणजे ब्रह्मकमळाचे. ब्रह्मकमळाचे फुल वर्षातून एकदाच येते ते देखील अगदी चार ते पाच तासांसाठी. असं म्हणतात की जो व्यक्ती ब्रह्मकमळाचे फुल फुलताना पाहतो त्याचे भाग्य उजळते. ज्याच्या घरी ब्रह्मदेवाचे फुल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्त्व अधिक आहे. घरात ब्रह्मकमळ लावल्यास कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो. पण घरात ब्रह्मकमळाचे झाड कसे लावावे आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.
ब्रह्मकमळ हे फुल हिमालयात जास्त प्रमाणात आढळते. उत्तराखंडचे हे राज्य फुल आहे. उत्तराखंडमधील पिंडारीपासून चिफला, रुपकुंड, हेमकुंड, ब्रजगंगा, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केदारनाथ येथे हे फुल मोठ्या प्रमाणात आढळते. काही नागरिक तिथून हे फुल आणतात आणि त्यांच्या कुंडीत वाढवतात. पण कुंडीत फुलाची लागवड कशी करायची हे जाणून घेऊया. त्यापूर्वी या फुलाला इतके महत्त्व का प्राप्त झाले याबाबत जाणून घेऊया.
ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे रुप मानले जाते जेव्हा हे फुल पूर्णपणे फुलते तेव्हा फुलावर भगवान विष्णुची आकृती दिसते. एका मान्यतेनुसार, भगवान शिवाने ब्रह्मकमळानेही जल शिंपडून गणेशाला जिंवत केले होते. त्यामुळं या फुलाला जीवनदायीनी फुलं असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान शिवाला ब्रह्मकमळाचे फुल अर्पण केल्यास लगेच फळ मिळते आणि भाग्योदय होतो. भगवान शिवाला सफेद रंगाचे ब्रह्मकमळाचे फुल अतिप्रिय आहे. इतकंच नव्हे तर हे फुल भगवान विष्णु यांनी शंकराला अर्पण केले होते. या फुलाला जोपण फुलताना बघतो त्याचे भाग्य उजळते.
घरामध्ये ब्रह्मकमळ रोप लावणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरात हे फूल उमलते, तिथे सुख-समृद्धी येते. या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि प्रगती होण्याची शक्यता असते. असे मानले जाते की या फुलाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते.
ब्रह्मकमळ फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. कर्करोग, सर्दी, डांग्या खोकला आणि थकवा बरा करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यासोबतच हे शरीरातील रक्त शुद्ध करते आणि सर्पदंश, प्लेग आणि हृदयाशी संबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी खूप मदत करते. ब्रह्मकमळमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म देखील आढळतात, जे जखमा भरण्यास मदत करतात. मात्र, यावर अद्याप शास्त्रीय आधार मिळालेला नाहीये.
घरात ब्रह्मकमळ लावायचे असल्यास सगळ्यात आधी साधी माती आणि जुने शेणखत मिसळून तयार करुन ठेवा. त्यानंतर मातीची मोठी कुंडी घेऊन त्यात ही माती टाकावी. त्यानंतर ब्रह्मकमळाचे एक पान घेऊन तीन ते चार इंच खोलीवर लागवड करा. पान लावल्यानंतर त्यात पुरेसे पाणी टाका.
लक्षात घ्या की, मातीची कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्याचा प्रकाश फार कमी येतो. ब्रह्मकमळासाठी अतिप्रमाणात सूर्यप्रकाश हानिकारक आहे. कारण ते थंड ठिकाणी चांगले वाढते. म्हणूनच हिमालयात ब्रह्मकमळाची झाडे मोठ्या प्रमाणात वाढते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )