मुंबई: नवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर पहिला येतो तो गरबा आणि रात्र जागवणं. मात्र कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींवर बंधनं आली आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसांत नऊ रंगाचे कपडे घालण्याची मजा तर काही वेगळीच असते. नवरात्रीपूर्वी या सगळ्याची खरेदी आणि लगबग सुरू होते. नवरात्रीसाठी अजून थोडा अवकाश आहे. मात्र आपल्याकडे या रंगाचे कपडे आहेत का आणि त्याचं महत्त्व काय आहे?
हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, या वर्षी शारदीय नवरात्रोत्सव 07 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 15 ऑक्टोबरला संपणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. यावेळी काही ठिकाणी घट बसवणे, नैवेद्य आणि रात्री गरबा देखील केला जातो. असं म्हणतात की नवरात्रीचे नऊ दिवस जर दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केली तर देवी प्रसन्न होते आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया.
पहिला दिवस- रंग पिवळा
पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. पिवळ्या रंगाचे कपडे घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. शुभकार्यात पिवळा रंग घातला जातो. पिवळा रंग हा आनंद देणारा आणि मन प्रसन्न करणारा आहे.
दुसरा दिवस - रंग हिरवा
दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारीणीची पूजा केली जाते. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालावे असं सांगितलं जातं.
तिसरा दिवस- रंग राखाडी
तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेची पूजा केली जाते. या दिवशी राखाडी रंगाचे कपडे घालावेत असं सांगितलं जातं.
चौथा दिवस रंग नारंगी
चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नारंगी कपडे परिधान करावेत असं सांगितलं जातं.
पाचवा दिवस रंग पांढरा
पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. यावेळी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत असं सांगितलं जातं.
सहावा दिवस रंग लाल
सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावे असं सांगितलं जातं.
सातवा दिवस रंग निळा
सातव्या दिवशी माता कालीची पूजा केली जाते. या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालावेत असं सांगितलं जातं.
आठवा दिवस रंग गुलाबी
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालावेत असं सांगतात.
नववा दिवस रंग जांभळा
नवव्या दिवशी माता जगदंबाच्या सिद्धिदात्री रुपाची पूजा करतात. त्यावेळी जांभऴ्या रंगाचे कपडे परिधान करावेत असं सांगतात.
(सूचना- या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही.)