मुंबई : कोणत्याही घरात प्रवेश केला असता काही अशा जागा असतात ज्या सर्वांचं लक्ष मोहून घेतात. घरात प्रवेश करताच या जागा आपल्याला खुणावतात. त्यापैकी एक म्हणजे सोफा सेट असणारा कोपरा.
घरात प्रवेश केल्यानंतर काही वेळ निवांत बसण्याची ही जागा. पण, तुम्हाला माहितीये का या जागेतही दिशा महत्त्वाचं काम करते.
म्हणजे घरात सोफा असणं महत्त्वाचं नाही, तर तो सोफा नेमका कोणत्या दिशेला आहे हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्राच्या मते घर जर पूर्व किंवा उत्तरमुखी असेल तर त्याचा लिविंग रुम पूर्वोत्तर दिशेला म्हणजेच इशान्य कोपऱ्यात हवा.
घर पश्चिममुखी असल्यास लिविंग रुम उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्येस असायला हवा. घर दक्षिणमुखी असल्यास आग्नेयेस लिविंग रुम असणं फायद्याचं ठरेल.
वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार घराचा दरवाजा पश्चिमेस असल्यास सोफा सेट नैऋत्येस असावा (दक्षिण पश्चिम).
घराचं दार उत्तरेस असल्यास दक्षिण- पश्चिम अर्थात नैऋत्येला सोफा सेट असावा. घर पूर्वमुखी असल्यासही नैऋत्येला सोफा असणं फायद्याचं.
इतरत्र कोणत्याही दिशेला घराचं दार असल्यास तर उत्तर आणि इशान्य कोपरे सोडून कुठेही सोफा ठेवता येऊ शकतो. यामुळं घरात आनंददायी वातावरण असेल. घरातील कर्त्या पुरुषानं कायम दारासमोर चेहरा करुन बसावं, हे फायद्याचं ठरेल.
(वरील संदर्भ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आले आहेत. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)