मुंबई : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे एक विषेश महत्व आहे. काल घराघरात गणपती विराजमान झाले. आता पुढेचे १० दिवस गणेश भक्त बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा करतील. तर आजच्या दिवसाचे महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. आज सर्वत्र ऋषीपंचमी साजरी होईल. भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषिपंचमी म्हणून साजरी केली जाते. ऋषीं विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषिपंचमी.
आजच्या या धवपळीच्या जगात आपल्या हातून नकळत अनेक पाप होतात. या नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ऋषिपंचमीचा व्रत केला जातो. चतुर्थी दिवशी गणेश पूजन झाल्यानंतर दुसर्यादिवशी महाराष्ट्रासह देशभरात ऋषिपंचमी साजरी केली जाते.
या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. पंचमीची तिथी ३ सप्टेंबरला मध्यरात्री ०१:५४ नंतर सुरू होते आणि २३:२८ वाजता संपते.
या दिवशी महिला नांगारापासून उत्पन्न होणारे धान्य, भाज्या ग्रहण करत नाहीत. फक्त एकदाच जेवण करतात. या व्रतामध्ये मिठाचे सेवन वर्ज्य आहे. स्नान केल्यानंतर अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली जाते. पूजेनंतर ऋषींचे नदीमध्ये विसर्जन करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.