Sports News : भारतीय क्रिकेट संघानं 1983 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला तो क्षण अतिशय महत्त्वाचा होता. देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये काहीशी तणावाची स्थिती असतानाच खेळाच्या निमित्तानं सबंध देश एकवटला आणि ती किमया झाली. साहेबांच्या देशात जात तिथं, भारताचं नाव उंचावणाऱ्या, कपिल देव यांच्या नेतृत्त्वात खेळलेल्या या संपूर्ण क्रिकेट संघाचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं. आजही तो क्षण आठवला की अनेकांकडे सांगण्यासारखं खूप काही असतं.
अशाच या संघाचा एक भाग असणारा खेळाडू सध्या भावनिक आव्हानांशी दोन हात करताना दिसत आहे. पत्नीच्या निधनामुळं खचलेल्या या खेळाडूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापुढं ठाकलेल्या या प्रसंगाची माहिती सर्वांना दिली आणि त्याला हुंदका दाटून आला.
1983 वर्ल्डकप गाजवणारा हा खेळाडू म्हणजे किर्ती आझाद. माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट लिहित पत्नी पूनम यांच्या निधनाची माहिती दिली. ज्यानंतर आता पत्नीला शेवटचा निरोप देताना त्यांनी जळत्या चितेचा फोटो शेअर केला आणि अनेकांच्याच काळजात चर्रss झालं.
Alvida Poonam……. pic.twitter.com/kDS8Id9geh
— Kirti Azad (@KirtiAzaad) September 3, 2024
My wife, Poonam no more. Left for her heavenly aboard at 12:40 PM. Thank you all for your good wishes.
— Kirti Azad (@KirtiAzaad) September 2, 2024
आझाद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावरील या प्रसंगाची माहिती दिली त्या क्षणापासूनच नेटकऱ्यांनी त्यांना आधार देत या प्रसंगात आपण सोबत असल्याची प्रतिक्रिया दिली. देशासाठी खेळणाऱ्या आणि कधीकाळी मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूला दु:खात पाहून क्रिकेटप्रेमींनीसुद्धा हळहळ व्यक्त केली.