मुंबई : आयपीएल 2021 मध्ये, बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या क्वालिफायर -2 सामन्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन वेगवेगळे फलंदाज दोन चेंडूंमध्ये 'झेलबाद' झाले पण प्रत्यक्षात ते दोघेही बाद झाले नाहीत. आता तुम्हालाही हे वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल पण हे असं घडलंय.
वरुण चक्रवर्ती 17व्या ओव्हरची गोलंदाजी करत होता. यावेळी दिल्ली कॅपिटल्स कोलकाताविरुद्ध फलंदाजी करत होती. जेव्हा त्याने ओव्हरता चौथा चेंडू टाकला, तेव्हा दिल्लीच्या हेटमायरने एक मोठा शॉट खेळला आणि शुभमन गिलने चौकारावर अतिशय उत्तम कॅच घेतला.
कॅच घेतल्यानंतर हेटमायरही पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. पण त्याचवेळी अंपायर थांबले आणि त्यानंतर समजलं की तो नो बॉल होता. अशावेळी हेटमायरला एका प्रकारे जीवनदान मिळालं.
पण यानंतर हे पुन्हा एकदा घडलं. जेव्हा हेटमायर परत आला त्यावेळी श्रेयसने क्रीज बदलली होती. यावेळी नो बॉल नंतरचा पुढचा चेंडू फ्री-हिट होता. श्रेयस अय्यरला या चेंडूवर मोठा शॉट खेळायचा होता. पण इयन मॉर्गनने त्याला या बॉलवरही कॅच घेतला. त्यावेळी मात्र फ्री हिट असल्याने, तो देखील नाबाद राहिला. कारण केवळ फ्री हिटवर रनआउट दिला जाऊ शकतो.
अशा स्थितीत कोलकात्याला दोन बॉलमध्ये दोन विकेट्स मिळाल्या. पण एकही फलंदाज बाद झाला नाही. मात्र असं असूनही दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी अपयशी ठरली. अखेर सामन्याच केकेआरने बाजी मारत फायनलचं तिकीट मिळवलं.