मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया पहिली २ टी-२० मॅच आणि मग ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. पण या सीरिजआधीच क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांचा कर्णधार एरॉन फिंचला तंबी दिली आहे. एरॉन फिंचनं मॅचदरम्यान स्टेडियममधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवल्याचा आरोप आहे.
बिग बॅश लीगच्या फायनलमध्ये मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार एरॉन फिंच मेलबर्न स्टार्सविरुद्ध खेळत होता. या मॅचमध्ये फिंच १३ रन बनवून आऊट झाला. आऊट झाल्यानंतर फिंचचा राग अनावर झाला आणि त्यानं स्टेडियममधल्या एका खुर्चीवर बॅट आपटली. याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं फिंचवर मर्यादा-१ चं उल्लंघन केल्याचा आरोप लावला. तसंच फिंचला क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आचारसंहिता २.१.२ नुसार उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. या मॅचमध्ये मेलबर्न रेनेगेड्सनं मेलबर्न स्टार्सचा १३ रननी पराभव केला आणि बिग बॅश लीग जिंकली.
Best shot Finch has played all summer #BBLFinal pic.twitter.com/GoZrEvfyyi
— Alex Black (@VirtualAlexB) February 17, 2019
बिग बॅश लीग संपल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. वर्ल्ड कप आधी भारताची ही शेवटची सीरिज आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली. ३ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला. तर टेस्ट सीरिजमध्येही भारतानं ऑस्ट्रेलियाला २-१नं हरवलं. मागच्या ७१ वर्षात भारतानं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली.