INDvsAUS: सीरिज सुरू होण्याआधीच कांगारूंकडून भारताचा धसका

भारत हा मायदेशात खेळणाऱ्या टीमपैकी सर्वश्रेष्ठ आहे.

Updated: Feb 19, 2019, 04:48 PM IST
INDvsAUS: सीरिज सुरू होण्याआधीच कांगारूंकडून भारताचा धसका title=

मुंबई : दोन टी-२० आणि पाच टी-२० मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येत आहे. ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय टीमचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय टीमचा ऑस्ट्रलियानंही धसका घेतला आहे. आपल्याला भारताविरुद्ध त्यांच्याच देशात खेळायचे आहे. त्यामुळे आपल्याला बचवात्मक पद्धतीने खेळावे लागेल, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच म्हणाला आहे. फिंचच्या या वक्तव्यामुळे भारतीय टीमबद्दल पाहुण्या ऑस्ट्रेलियाला किती दहशत बसली आहे, हे समोर येतंय. 

ऑस्ट्रलियाविरुद्ध होणारी ही सीरिज वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे सहाजिकच या सीरिजमध्ये भारतीय टीमचा उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया टीमचं नेतृत्व एरॉन फिंच करणार आहे. बिग बॅश लीगमध्ये फिंचच्या नेतृत्वात मेलबर्न रेनेगेड्सनं रविवारी मेलबर्न स्टार्सचा १३ रननी पराभव करत ऑस्ट्रेलियातील बिग बॅश करंडक आपल्या खिशात घातला.

फिंच ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, 'जेव्हा आपण ऑस्ट्रेलियासोबत परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी जातो, विशेष म्हणजे भारताच्या दौऱ्यावर, तेव्हा आपल्याला वेगळ्याच प्रकारच्या उत्साह आणि विश्वासाची गरज असते. भारताविरोधात खेळताना किंचीतसा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. त्याची मोठी किंमत मोजावी लागते. भारतीय टीम आपल्या देशात खेळताना अनुकूल परिस्थितीत अजूनही आक्रमकपणे खेळते. भारत हा मायदेशात खेळणाऱ्या टीमपैकी सर्वश्रेष्ठ आहे. भारताविरोधात खेळताना अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि विश्वासाने खेळायला हवे.

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधीच त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्वपद देण्यात आले. त्याने टेस्ट क्रिकेटमध्येही पदार्पण केले, पण तिथे चांगली कामगिरी करु न शकल्याने त्याला टीमबाहेर बसावे लागले. एरॉन फिंचला टी-२० मध्येही विशेष कामगिरी करता आली नाही. फिंच बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात १३ रन करून आऊट झाला.