मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील सामने चाहत्यांच्या लक्षात राहतात. शिवाय या सामन्यांमध्ये भिडणारे खेळाडूनांही आपण लक्षात ठेवतो. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक कामरान अकमल आणि भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर यांच्यातील वादाची आठवण प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात असेल. तर आता कामरान अकमलने आता पुन्हा एकदा त्या वादाची आठवण करून दिलीये.
लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालेल्या कामरान अकमलने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तो गौतम गंभीरसोबत झालेल्या वादाबद्दलही बोलला. अकमलला विचारण्यात आलं की, त्याचा सर्वात मोठा शत्रू कोण, गौतम गंभीर किंवा हरभजन सिंग. ज्यावर तो म्हणाला, यापैकी कोणीच नाही.
कामरान अकमल म्हणाला की, "माझं कोणाशीही वैर नाही. मुळात काही गैरसमज आहेत. आशिया कपमध्ये काही गैरसमज झाले होते. आम्ही दोघं चांगले मित्र आहोत."
2010 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स आमनेसामने खेळत होत्या. यावेळी गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. टीममधील इतर खेळाडू आणि अंपायर्सना बचावासाठी पुढे यावं लागलं होतं.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासोबत कामरान अकमलची अशीच एक बाचाबाची झाली होती. कामरान अकमलने पाकिस्तानसाठी एकूण 53 कसोटी सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याने 30 पेक्षा जास्त सरासरीने अडीच हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.