तिसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का, मार्करम दुखापतीमुळे बाहेर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Oct 18, 2019, 12:46 PM IST
तिसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का, मार्करम दुखापतीमुळे बाहेर

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. पण या टेस्ट मॅचआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. उजव्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे ओपनर एडन मार्करम तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळू शकणार नाही. ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने आधीच २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी आणि दुसऱ्या टेस्टमध्ये इनिंग आणि १३७ रननी विजय झाला होता.

एडन मार्करमला दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दुखापत झाली. मॅचमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे मार्करमने एका मजबूत गोष्टीवर राग काढला, यामुळे त्याला दुखापत झाल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितलं आहे.

'अशाप्रकारे घरी परत जाताना वाईट वाटत आहे. मी चूक केली आहे आणि त्याची मी संपूर्ण जबाबदारी घेतो. आमच्या टीममध्ये हे स्वीकारलं जाऊ शकत नाही. टीमला चुकीच्या पद्धतीने प्रभावीत केल्याचं मला जास्त दु:ख आहे,' अशी प्रतिक्रिया मार्करमने दिली आहे.

'या प्रकरणातून मी बरच काही शिकलो आहे. इतर खेळाडूही यातून काहीतरी शिकतील, असं मला वाटतं. खेळ भावना जास्त होतात आणि तुमचा ताबा सुटतो. माझ्याबाबतीतही तसंच झालं. मला कोणतंही कारण सांगायचं नाही. मी याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि टीमची माफी मागितली आहे. मी लवकरच याची भरपाई करणार आहे,' असं मार्करम म्हणाला.