अमेरिकन खुल्या स्पर्धेचं टेनिस सेंटर आता हॉस्पिटल

अमेरिकेत कोरोनाचं संकट इतकं मोठं आहे की ... 

Updated: Mar 31, 2020, 01:53 PM IST
अमेरिकन खुल्या स्पर्धेचं टेनिस सेंटर आता हॉस्पिटल
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : अमेरिकेत Coronavirus कोरोनाचं संकट इतकं मोठं आहे की तिथली हॉस्पिटल आता कमी पडू लागली आहेत. त्यामुळे अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिथे खेळवली जाते त्या बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या काही भागात ३५० खाटांचं तात्पुरतं हॉस्पिटल उभारलं जाणार आहे.

अमेरिकेतील हॉस्पिटल्स अक्षरशः कोरोना रुग्णांनी भरली आहेत. रुग्णांसाठी खाटा कमी पडत आहेत. व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्य, मदत कमी पडत आहे. न्यूयॉर्कमध्ये तर कोरोनाचा कहर सर्वाधिक असून तिथं तब्बल १३४२ रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता टेनिस सेंटरवरच तात्पुरतं हॉस्पिटल उभारण्याची वेळ अमेरिकन प्रशासनावर आली आहे.

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी असलेल्या इनडोअर भागात मंगळवारपासून तात्पुरतं हॉस्पिटल उभारण्याची सुरुवात केली जाईल, अशी माहिती अमेरिकन टेनिस असोसिएशनचे प्रवक्ते ख्रिस विड्माईर यांनी रॉयटर या वृत्तसंस्थेला दिली.

न्यूयॉर्क आमचं घर आहे. या संकटाच्या काळात आम्ही एकत्र आहोत. मदतीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं विड्माईर यांनी म्हटलंय.

न्यूयॉर्क शहर आपत्कालीन व्यवस्थापनानं सोमवारी त्यांची हॉस्पिटल बनवण्याची योजना अमेरिकन टेनिस असोसिएशनला कळवली आणि त्यांनी तातडीनं त्याला होकार दिला.

 

टेनिस स्टेडियमवर बनवलं जाणाऱ्या या तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये कोरोना व्यतिरिक्त आजारी असलेल्या रुग्णांना ठेवलं जाणार आहे. गरजेनुसार त्यात बदल केले जातील.

कोरोनाच्या रुग्णांमुळे हॉस्पिटलमध्ये जागा कमी पडत असल्यानं हॉस्पिटलमध्ये जेवढी क्षमता वाढवता येईल, तेवढी वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कवरही ६८ खाटांचं फिल्ड हॉस्पिटल उभारण्यास सुरुवात झाली आहे.