Rohit Sharma Six Record in WTC History : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाचवा आणि शेवटचा टेस्ट सामना सुरु आहे. धर्माशालाच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येत असून कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या खेळाडूंनी लोटांगण घातलं. तर या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चांगली खेळी केली. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं असून त्याने यावेळी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
आज भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने सिक्स लगावला. या सिक्ससोबतच त्याने असा पराक्रम केला जो आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC च्या इतिहासात 50 सिक्स लगावणारा तो जगातील दुसरा फलंदाज बनला आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून बहुतेक टेस्ट सामने या अंतर्गत होतायत. दरम्यान, या काळात सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आहे. त्याने 45 सामन्यांच्या 82 डावात 78 सिक्स लगावले आहेत.
याशिवाय रोहित शर्माने आत्तापर्यंत 32 सामन्यांच्या 54 डाव खेळले असून आजच्या सामन्यात त्याने पहिला सिक्स मारताच त्याच्या सिक्सची संख्या 50 वर पोहोचली आहे. बेन स्टोक्सने 45 सामन्यात 78 सिक्सेस मारले आहेत, तर रोहितने केवळ 32 सामन्यांमध्ये 50 सिक्स पूर्ण केलेत. बेन स्टोक्ससाठी ही सिरीज फारशी चांगली गेली नाही.
बेन स्टोक्स आणि रोहित शर्मानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो तो म्हणजे ऋषभ पंत. त्याने 24 सामने खेळले असून 38 सिक्स मारलेत. यानंतर आता 100 टेस्ट सामना खेळणारा जॉनी बेअरस्टो येतो. त्याने 35 सामने खेळल्यानंतर 29 सिक्स ठोकले आहेत. सध्याच्या काळात रोहित शर्माची बरोबरी करणं सध्या तरी कठीण दिसतंय.
धर्मशाला टेस्ट सामन्यात यशस्वी जयस्वालने पहिल्या 3 बॉलमध्ये 1 रन करत कोहलीचा विक्रम मोडला. एका टेस्ट सिरीजमध्ये सर्वाधिक 655 रन करणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव फलंदाज होता. आता हा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर झालाय. यशस्वी जयस्वालने सिरीजमधील पाच टेस्ट सामन्यात तब्बल 712 रन केलेत. यात 2 शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
धर्मशाला टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्यय घेतला. पण टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडची संपूर्ण टीम 218 रन्सवर ऑलआऊट झाली. कुलदीप यादवने सर्वाधिक 5 तर रविचंद्रन अश्विनने 4 विकेट घेतल्या. इंग्लंडतर्फे जॅक क्राऊलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. मात्र या सामन्यात बुमराहला एकही विकेट काढता आली नाही.