अर्जुन तेंडुलकरचा जबरदस्त बॉल, बॅट्समन क्लीन बोल्ड!

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सध्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे.

Updated: Jun 18, 2019, 04:32 PM IST
अर्जुन तेंडुलकरचा जबरदस्त बॉल, बॅट्समन क्लीन बोल्ड!

लंडन : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सध्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. डावखुरा फास्ट बॉलर आणि मधल्या फळीतला बॅट्समन असलेल्या अर्जुन तेंडुलकरने त्याच्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केलं आहे. इंग्लंडमध्ये एमसीसी यंग क्रिकेटर्स टीमकडून खेळताना पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकर चर्चेत आला आहे. अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या स्विंग झालेल्या बॉलवर सरेचा बॅट्समन बोल्ड झाला.

या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या सरेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दिवसाच्या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अर्जुन तेंडुलकरने केली आणि पहिल्याच बॉलपासून अर्जुन योग्य टप्प्यावर बॉल टाकत होता. अर्जुन तेंडुलकरने सरेच्या खेळाडूला अत्यंत भेदक अशा बॉलवर माघारी धाडलं. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

चांगली सुरुवात केल्यानंतरही सरेच्या टीमने मॅचमध्ये पुनरागमन केलं. इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम कुरनने १४० बॉलमध्ये ९१ रन केले. यामध्ये १५ फोरचा समावेश होता. जॅमी स्मिथने सॅम कुरनला चांगली साथ दिली. स्मिथने अर्धशतकी खेळी केली. पण दिवसाच्या शेवटी पुन्हा एकदा सरेला धक्के लागले. यामुळे त्यांचा स्कोअर ६० ओव्हरमध्ये २७६/६ एवढा झाला.

अर्जुन तेंडुलकरने बीबीए गेड्स याचीही विकेट घेतली. दिवसभरात अर्जुन तेंडुलकरने ११ ओव्हरमध्ये ५० रन देऊन २ विकेट घेतल्या. अर्जुन तेंडुलकरने ४.५५ रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. तसंच त्याने २ ओव्हर मेडनही टाकल्या.

इंग्लंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याआधी अर्जुन तेंडुलकरने टी-२० मुंबई लीगमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती. टी-२० मुंबई लीगमध्ये अर्जुन तेंडुलकर आकाश टायगर्सकडून खेळला होता.