नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर आर. अश्विन याने त्याच्या खास चाहत्यांपैकी एक असलेल्या पी.वेंकटेशन यांची एक मोठी इच्छा पूर्ण केली आहे. अश्विन भलेही सध्या टीममध्ये नसला तरी त्याने वेंकटेशन यांना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे तिकीट दिले आणि वेंकटेशन यांच्या चेह-या हसू फुलले.
वेंकटेशन हे सध्या किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. त्यांना अश्विनने तिकीट दिल्यावर हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेतला. त्यांनी अश्विन आणि त्याच्या मॅनेजमेंट टीमचे आभार मानले. माझ्यासारख्या माणसासाठी अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. मी अश्विनचे हे उपकार कधीही विसरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अश्विनने सांगितले की, ‘आम्ही हे अजिबातच पब्लिसिटीसाठी केलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या चेह-यावर हसू आणण्याचा हा अश्विन फाऊंडेशनचा एक प्रयत्न होता. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणे तसे कठिणच, पण आम्ही प्रयत्न करत असतो. वेंकट हे एक क्रिकेटप्रेमी आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी जे केलं ते खूप कमी आहे’.