काम चोरीचं आव समाजसेवकाचा, चोरीचं पापक्षलन करणारा अनोखा चोर

चोरीच्या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

Updated: Jun 18, 2019, 12:30 PM IST
काम चोरीचं आव समाजसेवकाचा, चोरीचं पापक्षलन करणारा अनोखा चोर title=

विशाल करोळे, प्रतिनिधी, झी मीडिया, औरंगाबाद : चोरीच्या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला, मात्र त्याच्या चौकशीच ज्या गोष्टी निघाल्या त्या ऐकून पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.

काम चोरीचं मात्र आव समाजसेवकाचा अशा ३८ वर्षीय किशोर वायाळ याला पोलिसांनी अटक केली. वैजापूरच्या एका घरातून तब्बल ७१ तोळे सोनं या चोरानं चोरलं होतं. त्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या आरोपीला अटक केली आणि त्याची धक्कादायक कुंडलीच बाहेर आली. या चोराचे किस्से ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल असे या चोराचे प्रताप आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मेरा गावात हा चोर राहतो. या चोराचे गावात आलीशान घर आहे, इतकंच नाही तर या चोराच्या घरी ३ आलीशान मोटारी सुद्धा आहेत.  धक्कादायक म्हणजे या चोराचे राज्यात आणि राज्याबाहेरही नेटवर्क आहे. चोरीला जाताना हा चोर स्थानिक नेटवर्क मधील चोर सोबत घ्यायचा आणि त्याला दिवसाला १ हजार रुपये आणि चोरीच्या पैशांतून बक्षीस सुद्धा द्यायचा. त्याने अनेक ठिकाणी कामाला अशी लोक ठेवली होती, त्यातून चोरी करून मुद्देमाल विकून हा चोर आपल्या गावात यायचा.

गावामध्ये या चोराचं वेगळं रुप होतं ते म्हणजे एका समाजसेवकांच. लोकांच्या मदतीसाठी त्याने आपले मामा नावाची एक संस्था स्थापन केली होती. यातून त्यानं गावात सामूहिक विवाह लावले. गावाला टँकरनं यावेळी पाण्याची सोय केली. गावातील शाळेसाठी सुद्धा त्याने काम केलं.

चोरीच्या एकूण रकमेतून तो किमान १० टक्के समाजकार्य दानधर्मासाठी सुद्धा करायचा. ज्या ७२ तोळे सोनं चोरीत तो गजाआड गेला, त्या चोरीच्या पैशातून तो शिर्डीच्या साई संस्थानला रुग्णवाहिका सुद्धा दान करणार होता,  मात्र पोलिसांनी तपास करत शिताफीनं त्याला अटक केली आणि हा सगळा प्रकार समोर आला.  त्याच्यावर औरंगाबाद बाहेरही तब्बल१२३ गुन्हे दाखल आहेत.

चोरी करतांना हा चोर दुपारी चोरी करायचा. त्याच्या साथीदारांकडून घरात कुणी नाही याची माहिती घ्यायचा आणि त्यानंतर घर फोडून चोरी करण्याची याची पद्धत होती. चोरी केल्यानंतर पापक्षालनासाठी तो पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करायचा. मात्र चोरी हा गुन्हाच त्यामुळे अखेर चोरीचं एक प्रकरण त्याच्या अंगलट आलं आणि आता बेड्या पडल्या. आणि हा पांढरपेशा चोर अखेर गजाआड झाला.