lok sabha election 2024 : नाशिक आणि दिंडोरीत महायुती आणि मविआत गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडालीय. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरेंनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती आहे.. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतं. त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार असं समोर येतंय.
एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज बाशिंग बांधून बसलेत. त्यात दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक असणा-या शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतलाय.. महाराजांच्या भक्त परिवारातल्या प्रतिनिधींनी हा अर्ज घेतलाय. 26 एप्रिलला शांतीगिरी महाराज अर्ज दाखल करणार आहेत.. शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.. छगन भुजबळांचे सहकारी दिलीप खैरे यांच्यानंतर महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतीगिरी महाराजांनी नाशिकसाठी अर्ज घेतल्याने नाशिकचा गुंता आणखी वाढलाय.
नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलीय तर दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतंय.. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे.पी. गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहे.. जे.पी. गावित यांनी आज उमेदवारी अर्ज घेतलाय.. दिंडोरीची जागा माकपला सोडण्याची मागणी त्यांनी केली होती.. मात्र शरद पवार गटाकडून भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेताय..
तीन तीन पक्ष एकत्र येत मविआ आणि महायुतीची स्थापना झालीय. त्यामुळे एकेका जागेवरुन रस्सीखेच पाहायला मिळतेय.. अर्थात त्यामुळे फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाचा होणार हे समजण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल..