BJP candidate Raksha Khadse: देशभरात लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजलंय. महाराष्ट्रात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होतायत. यातील 2 टप्पे आज पूर्ण झाले आहेत. आता राज्यातील 5 टप्पे शिल्लक आहेत. या 5 टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचे कार्य सुरु आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र यानंतर रक्षा खडसे यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. यामागे कारणंही तसंच आहे. याबद्दल जाणून घ्या.
भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरला. या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी अवैध गौण खनिज उत्खलन प्रकरणातील असलेल्या खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी हा आरोप केला आहे.
आज अर्ज छाननीच्या दिवशी याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकार्याकडे तोंडी आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्र वेळेत न दिल्याने हा आक्षेप फेटाळला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर हे याबाबत दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात रक्षा खडसे ह्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी अवैध गौण खनिज उत्खलन प्रकरणातील खटल्याची माहिती लपवली आहे. यासंदर्भात मी दाद मागितली. पण हा आक्षेप फेटाळण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी म्हटले आहे.