Ind vs Aus: टीम इंडिया समोर स्नेक क्रॅक्सचं आव्हान? टॉस जिंकून बॅटींग घेतली पण आता...

AUS vs IND Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या कसोटीमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 22, 2024, 07:51 AM IST
Ind vs Aus: टीम इंडिया समोर स्नेक क्रॅक्सचं आव्हान? टॉस जिंकून बॅटींग घेतली पण आता... title=
भारतीय संघांसमोर स्नेक क्रॅक्सचं आव्हान

AUS vs IND Border Gavaskar Trophy 2024: बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमधील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाशी पर्थमधील मैदानावर भीडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र होण्याच्या दृष्टीने भारताला ही मालिका फारच महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेमधील पाच सामन्यांपैकी जास्तीत जास्त सामने जिंकण्यावर भारताचा भर असेल यात शंका नाही. मात्र भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन गोलंदाज आणि फलंदाजांबरोबर अजून एका आव्हानाला तोंड द्यावं लागणार आहे. हे आव्हान म्हणजे, पर्थच्या मैदानावरील स्नेक क्रॅक्स!

स्नेक क्रॅक्स म्हणजे काय?

पर्थच्या मैदानावरील जुनी 'वाका' खेळपट्टी ही तिच्या वेगासाठी आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंसाठी ओळखली जायची. आता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑप्टर स्टेडियमवरील खेळपट्टीही अशीच आहे. कोरड्या हवामानामध्ये खेळपट्टीवरील भेगा या अधिक रुंद होतात. यामुळे गोलंदाजांना अतिरिक्त उसळी तर मिळतेच शिवाय फिरकीपटूंनाही याची मदत होते. अनेकदा या स्नेक क्रॅक्स अगदी 5 मिलीमिटरपर्यंत रुंद असतात. त्यामुळे मधल्या कालावधीमध्ये फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरुन राहणं कठीण जातं. आता या भेगांना स्नेक क्रॅक्स का म्हणतात तर या भेगा खेळपट्टीवर फारच वेड्यावाकड्या पद्धतीने पसरलेल्या असतात. त्यामुळे त्या सापासारख्या वाटतात. म्हणूनच त्यांना हे नाव पडलं आहे

उत्तम स्पर्धा पाहायला मिळेल

पर्थच्या मैदानावरील खेळपट्टी ही मागील बऱ्याच काळापासून कव्हरखाली होती. या खेळपट्टीचे क्युरेटर आयसॅक मॅकडॉनल्ड आहेत. या खेळपट्टीवर बॅट आणि बॉसची उत्तम स्पर्धा पाहायला मिळेल असं मॅकडॉनल्ड यांनी म्हटलं आहे. या मैदानाचा इतिहास पाहिल्यास येथे स्नेक क्रॅक्सने सामन्यावर मधल्या कालावधीत चांगलाच प्रभाव पडत असल्याचं दिसतं. मात्र आता क्यरेटर्सच्या सांगण्यानुसार, या नव्या खेळपट्टीवर मोठे स्नेक क्रॅक्स दिसून येणार नाहीत. त्यामुळे फलंदाजांना त्रास होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

क्युरेटर काय म्हणतात?

"सध्याची खेळपट्टी ही परिस्थितीवर अवलंबून अशी बनवण्यात आली आहे. या खेळपट्टीला मऊपणा यावा म्हणून आम्ही तिच्यावर रोलर फिरवतोय. बॅट आणि बॉलचा उत्तम सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सूर्याचं दर्शन सामन्यादरम्यान झालं तर हे खेळपट्टीसाठी चांगलं आहे. आम्ही खेळपट्टीवर समाधानी आहोत," असं आयसॅक मॅकडॉनल्ड यांनी 'बिझनेस स्टॅण्डर्स'शी बोलताना म्हटलं आहे. "सध्याच्या हवामानाने खेळपट्टीवर भेगा पडतील असं वाटत नाही. अर्थात थोडा फार परिणाम होईल. सामन्यादरम्यान गवतामुळे चेंडूला चांगली उसळी मिळेल. मात्र स्नेक क्रॅक्स निर्माण होण्याइतका परिणाम नसणार," असंही आयसॅक मॅकडॉनल्ड म्हणाले.

स्नेक क्रॅक्स फॅक्टरचा विचार करता भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली असली तरी या मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकून राहणं आव्हानात्मक ठरणार आहे. आता खरंच स्नेक क्रॅक्सचा परिणाम सामन्यावर होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.