India Vs Australia : दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. 10 विकेट्सने दुसऱ्या वनडेत कांगारूंनी विजय मिळवला आहे. अवघ्या 11 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने विजयाला गवसणी घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे तिसरी वनडे महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रोहित शर्माने टीममध्ये कमबॅक केल्याने भारत मोठी स्कोर करेल अशी अपेक्षा होती, मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी पहायला मिळाली. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरपासून मिचेल स्टार्कने त्याची जादू दाखवली आणि 5 टीम इंडियाच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं.
टीम इंडियाकडून केवळ विराट कोहलीने सर्वाधिक म्हणजेच 31 रन्सची खेळी केली. त्यानंतर अक्षर पटेलने 29 रन्स केले. याशिवाय रविंद्र जडेजा 16 तर कर्णधार रोहित शर्मा 13 रन्स केले. या चार जणांशिवाय कोणत्याही खेळाडूंना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. 26 ओव्हर्समध्ये 117 रन्सवर संपूर्ण टीम इंडिया ऑलआऊट झाली.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलेल्या 118 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सामना एकतर्फी झाल्याचं दिसून आलं. कांगारूंच्या ओपनिंग जोडीनेच अवघ्या 11 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण केलं. यावेळी ट्रेविस हेडने 30 बॉल्समध्ये 51 तर मिचेल मार्शने 36 बॉल्समध्ये 66 रन्सची तुफान खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयाने वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली आहे.
टीम इंडियाने आजच्या सामन्यात अगदी लाजिरवाणी कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील वनडेचा इतिहास पाहिला तर हा टीम इंडियाचा सर्वात कमी स्कोर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात कमी स्कोर असल्याची नोंद आहे. या पराभवासह टीम इंडियाच्या अडचणीत वाढ दाली आहे.