ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर कब्जा, इंग्लंडला १८५ रननी लोळवलं

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १८५ रननी विजय झाला आहे.

Updated: Sep 9, 2019, 10:44 AM IST
ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर कब्जा, इंग्लंडला १८५ रननी लोळवलं

मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १८५ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला ऍशेस आपल्याकडेच ठेवण्यात यश आलं आहे. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ने आघाडी मिळाली आहे. चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३८३ रनची गरज होती. दिवसाची सुरुवात इंग्लंडने १८ रनवर २ विकेट अशी केली, पण संपूर्ण टीम १९७ रनवर ऑल आऊट झाली.

इनिंगच्या सुरुवातीला इंग्लंडच्या जो डेनली (५३ रन) आणि जेसन रॉय (३१ रन) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ रनची पार्टनरशीप केली. पण पॅट कमिन्सने जेसन रॉयला आणि बेन स्टोक्सला माघारी पाठवलं आणि इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. यानंतर डेनलीने जॉनी बेयरस्टो (२५ रन) सोबत ४५ रनची पार्टनरशीप केली. मिचेल स्टार्कने बेयरस्टोची विकेट घेतली. यानंतर जॉस बटलर (३४ रन) आणि क्रेग ओव्हरटन (२१ रन) यांनी सातव्या विकेटसाठी ३४ रन केले. हेजलवूडने बटलरची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला विजयाजवळ नेलं.

बटलरची विकेट गेल्यानंतर इंग्लंडच्या शेवटच्या ३ विकेट झटपट गेल्या. जोफ्रा आर्चरला नॅथन लायनने १ रनवर आणि जॅक लीचला लेबुशानने आऊट केलं. हेजलवूडने ओव्हरटनची विकेट घेतल्यानंतर मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकली. स्टुअर्ट ब्रॉड शून्य रनवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर हेजलवूड आणि नॅथन लायनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्क आणि मार्नस लेबुशानने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

या मॅचच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांची इनिंग १८६/६ वर घोषित केली. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या १९६ रनच्या आघाडीमुळे इंग्लंडला ३८३ रनचं आव्हान मिळालं.

पहिल्या इनिंगमध्ये २११ रनची खेळी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आता ओव्हलमध्ये होणारी पाचवी टेस्ट इंग्लंडने जिंकली तर सीरिज बरोबरीत सुटेल. पण मागच्या ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्यामुळे ऍशेस त्यांच्याकडेच राहिल. याआधी झालेल्या ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१ने विजय झाला होता. ओव्हल टेस्ट १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.