मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये रविवारी सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. टेनिस विश्वात वर्चस्व प्रस्थापित करत सर्वांनाच हेवा वाटेल अशी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रॉजर फेडरर याला यंदांच्या ऑस्ट्रेयिन ओपन या मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ग्रीसच्या अवघ्या २० वर्षीय स्टीफेनो स्ट्सीपास या खेळाडूने गतवर्षीच्या विजेत्या फेडररला नमवत त्याला पराभूत केलं. ज्यामुळे आता फेडररचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
स्ट्सीपासच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला असून, टेनिस विश्वात आता एका नव्या खेळाडूचा प्रवेश होत असल्याची ही चाहूल असल्याचं मत टेनिसप्रेमींनी मांडलं आहे. आपल्याहून १७ वर्षे वरिष्ठ असणाऱ्या आणि टेनिस कोर्टचा दांडगा अनुभव असणाऱ्या फेडररला स्ट्सीपासने ६-७, ७-६, ७-५ आणि ७-६ असा सेटमध्ये नमवत विजयी पताका उंचावली. स्ट्सीपासने दुसऱ्यांदा एखाद्या ग्रँड स्लॅमच्या उपउपांत्य फेरित प्रवेश मिळवला आहे. यापुढे त्याच्यासमोर स्पेनच्या रॉबर्टो बतिस्टा या खेळाडूचं आव्हान असणार आहे.
.@StefTsitsipas is mixing things up on the tennis court
It's clearly working #AusOpen pic.twitter.com/3q17cc8AZ4
— #AusOpen (@AustralianOpen) January 20, 2019
टेनिसचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररला नमवल्यानंतर स्ट्सीपासने त्याचा आनंद व्यक्त केला. 'या विजयाचा आनंद शब्दात व्यक्त करणं निव्वळ अशक्य आहे. सध्याच्या घडीला या विश्वातील सर्वाधिक आनंदी व्यक्ती मीच आहे. खेळताना आक्रमक शैली आणि तशीच धारणा ठेवणं, संयमामे खेळणं आणि त्या क्षणाला महत्त्वं देणं हे फारच महत्त्वाचं असतं', असं तो म्हणाला. यावेळी त्याने कोर्टवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे आभार मानत अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद यापूर्वी कधीही न पाहिल्याची प्रतिक्रिया दिली. सोबतच फेडरर म्हणजे एक अविश्वसनीय चमत्कारच असल्याचं म्हणत त्याने आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.