ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ऋषभला म्हणाले 'अच्छा, तूच तो जो स्लेजिंग करतो'

ऋषभला पाहताच त्यांना मैदानावरचे काही क्षण आठवले आणि...

Updated: Jan 3, 2019, 10:51 AM IST
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ऋषभला म्हणाले 'अच्छा, तूच तो जो स्लेजिंग करतो' title=

मुंबई : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्स दरम्यान चार टेस्ट मॅचची एक सीरिज खेळली जातेय. या दरम्यान दोन्ही टीम्सचे खेळाडू मैदानावर एकमेकांची जोरदार स्लेजिंग (चिडवणं) करतानाही दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा टिम पेन आणि टीम इंडियाचा सर्वात तरुण खेळाडू ऋषभ पंत हेदेखील यात मागे नाहीत... आणि याकडे प्रेक्षकांचंही चांगलंच लक्ष आहे. 

नुकतंच, तिसऱ्या टेस्टनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दोन्ही टीम्सला आपल्या निवासस्थानी आमंत्रण दिलं होतं. ऋषभला पाहताच त्यांना मैदानावरचे काही क्षण आठवले आणि क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले 'Aah yes! You sledge right?' ('अच्छा, तूच तो जो स्लेजिंग करतो')...

स्कॉट यांना ऋषभ त्याच्या खेळण्यासोबतच स्लेजिंगसाठीही आठवणीत राहिला हे विशेष... पण खरं म्हणजे ही स्लेजिंग केवळ मैदानापुरतंच मर्यादित राहिलेली आहे. दोन्ही टीम्सचे खेळाडू खेळाडूवृत्तीनं एकमेकांना सामोरे जाताना दिसत आहेत... आणि हे ऋषभनंही नुकतंच आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं. 

मैदानावर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने रिषभ पंतची एकाग्रता भंग करण्यासाठी स्लेजिंग करायला सुरुवात केली. 'एकदिवसीय संघात आता धोनी परतला आहे. तू आता होबार्ट हरिकेन्सकडून खेळायला सुरुवात कर. होबार्ट हे छान शहर आहे एकदा विचार कर. आपण त्या ठिकाणी तुला छानसे घर घेऊन देऊ... आम्ही तुला डिनरलाही नेऊ... फावल्या वेळेत तू मुलांना सांभाळशील का? मी आणि माझी बायको बाहेर जेवायला किंवा सिनेमाला जाऊ तेव्हा तू आमची पोरं सांभाळशील का?' असं म्हणत टीमनं ऋषभला चिडवलं... आणि ऋषभनं हे खरोखरच मनावर घेतलं म्हणा ना... 

ऋषभनं खरोखरच टीम पेनच्या घरी जाऊन त्याच्या मुलांना सांभाळलं... पेनची पत्नी बोनी हिने 'बेस्ट बेबीसीटर' अशी कॅप्शन देऊन हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.