मुंबई : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने पुन्हा गोल्ड मेडलची कमाई केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू कृष्णा नागर याने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. कृष्णाने गोल्ड मेडल जिंकल्यामुळे हे भारताचं पाचवं गोल्ड मेडल आहे.
रविवारी कृष्णाने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या एसएच6 फायनलमध्ये हाँगकाँगच्या चू मान काई 21-17, 16-21, 21-17 असा पराभव केला. कृष्णा नागरने हा सामना 43 मिनिटांत जिंकला. यासह, कृष्णा नागर पॅरालिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा प्रमोद भगत नंतर दुसरा भारतीय शटलर बनला आहे.
या विजयासह नागरने चू मान काई विरुद्ध 3-1 असा विक्रम केला आहे. यापूर्वी दोन खेळाडूंमध्ये तीन सामने खेळले गेले, त्यापैकी नागरने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याच वेळी, एक सामना चू मान काईने जिंकला होता.
टोक्यो गेम्समध्ये भारताच्या पदकांची संख्या आता 19 पर्यंत पोहोचली आहे. कृष्णाने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये 5वं गोल्ड मेडल जिंकलं आहे. प्रमोद भगतने शनिवारीच बॅडमिंटनमध्ये चौथं सुवर्ण मिळवलं होतं. यापूर्वी मनीष नरवाल, अवनी लेखरा आणि सुमित अंतिल यांनी यापूर्वी गोल्ड मेडल जिंकली आहेत.
तर नुकतंच आज सकाळी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी सिल्वर मेडल पटकावलं आहे. सुहास नोएडाच्या गौतम बुद्ध नगरचे डीएम आहेत.
बॅडमिंटन पुरूष एकेरी एसएल 4 च्या अंतिम सामन्यात सुहास एल यथिराजने पहिली फेरी 21-15 ने आपल्या नावावर केली.तर दुसऱ्या फेरीत फ्रांन्सच्या लुकास माजुरने 21-17ने बाजी मारली. नंतर तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत यथिराज 15-21ने पराभूत झाले. त्यामुळे ते सुवर्णपदक मिळवण्यापासून वंचित राहिले.