भारताला पराभवाचा धक्का देत बांगलादेशने इतिहास घडवला

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. 

Updated: Nov 3, 2019, 10:50 PM IST
भारताला पराभवाचा धक्का देत बांगलादेशने इतिहास घडवला title=

नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. भारताविरुद्ध बांगलादेशचा हा टी-२० क्रिकेटमधला पहिलाच विजय आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ९ टी-२० मॅच झाल्या आहेत. भारताने ठेवलेलं १४९ रनचं आव्हान बांगलादेशने १९.३ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

१८ ओव्हरपर्यंत बांगलादेशला हे आव्हान खडतर जाईल असं वाटत होतं. पण खलील अहमदच्या १९व्या ओव्हरमध्ये मुशफिकुर रहीमने लागोपाठ ४ फोर मारले. या ओव्हरमध्ये बांगलादेशने १८ रन काढल्या. यानंतर बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त ४ रनची गरज होती.

आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या शिवम दुबेला रोहित शर्माने शेवटची ओव्हर दिली. दुबेने त्याच्या पहिल्या बॉलला एकही रन दिली नाही. यानंतर दुसऱ्या बॉलला महमदुल्लाहने २ रन काढल्या. शिवम दुबेने पुढचा बॉल वाईड टाकला. यानंतरच्या बॉलला महमदुल्लाहने सिक्स मारून बांगलादेशला जिंकवलं.

भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात वाईट झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये लिटन दास ७ रन करून माघारी परतला. मोहम्मद नईम आणि सौम्य सरकारने बांगलादेशचा डाव सावरायला सुरुवात केली. मोहम्मद नईम २६ रनवर आणि सौम्य सरकार ३९ रनवर आऊट झाले. मुशफिकुर रहीमने ४३ बॉलमध्ये नाबाद ६० रनची खेळी केली. तर कर्णधार महमदुल्लाह ७ बॉलमध्ये १५ रनवर नाबाद राहिला. भारताकडून दीपक चहर, खलील अहमद आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकून पहिले भारताला बॅटिंग दिली. पण भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. यानंतर भारताला वारंवार धक्के लागतच राहिले, पण शेवटच्या २ ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला १४८/६ पर्यंत पोहोचता आलं.

भारताने १९व्या ओव्हरमध्ये १४ रन आणि २०व्या ओव्हरमध्ये १६ रन केल्यामुळे या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदर ५ बॉलमध्ये १४ रनवर नाबाद आणि कृणाल पांड्या ८ बॉलमध्ये १५ रनवर नाबाद राहिला. शिखर धवनने सर्वाधिक ४१ रनची खेळी केली.

पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये २ फोर मारल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ९ रनवर आऊट झाला. यानंतर ठराविक अंतरानंतर भारताला धक्के लागतच होते. केएल राहुल १५, श्रेयस अय्यर २२ आणि ऋषभ पंत २७ रन करून आऊट झाले. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा शिवम दुबे फक्त १ रन करुन माघारी परतला.

बांगलादेशकडून शैफूल इस्लाम आणि अमिनुल इस्लामला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या, तर अफीफ हुसेनला १ विकेट घेण्यात यश आलं.