मुंबई : अफगाणिस्तान क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने योगदान दिलं आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची भारतामध्ये टी-२० लीग करण्याची मागणी बीसीसीआयने फेटाळून लावली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात टी-२० लीग करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आम्ही आमची स्वत:ची आयपीएल आयोजित करतो, त्यामुळे त्यांचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी १६ मे रोजी मुंबईत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाप्रबंधक (क्रिकेट संचालन) सबा करीम यांची भेट घेतली, तेव्हा हा मुद्दा मांडला होता.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असदुल्ला खान यांनी देहरादून आणि ग्रेटर नोएडा बरोबरच आणखी एका मैदानाची मागणी केली आहे. बीसीसीआयला या मागणीबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यामुळे लखनऊ अफगाणिस्तान टीमचं भारतातलं तिसरं घरचं मैदान असू शकतं. देहरादूनमध्ये फाईव्ह स्टार हॉटल नसल्यामुळे टीमचा पाहुणचार करणं अडचणीचं होतं. त्यामुळे लखनऊचं मैदान आम्हाला देण्यात यावं, अशी मागणी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी असदुल्ला खान यांनी केली.
सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळवल्या जात नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या घरच्या सीरिजचं आयोजन हे भारतामध्ये केलं जातं.
अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमाचं आय़ोजन शारजाहमध्ये ५ ते २१ ऑक्टोबर २०१८ दरम्यान झालं होतं. यामध्ये ५ टीम सहभागी झाल्या होत्या. मोहम्मद नबीच्या नेतृत्वात खेळलेल्या बाल्ख लिजेंड टीमचा या स्पर्धेत विजय झाला होता. या स्पर्धेत क्रिस गेल, ब्रेन्डन मॅक्कलम, बेन कटिंग, शाहिद आफ्रिदी, कॉलिन इन्ग्राम, कॉलिन मुन्रो या परदेशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
रणजीच्या १० मोठ्या टीमसोबत सहयोगी सदस्य म्हणून अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकांना जोडून घेण्याची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणीही बीसीसीआयने मान्य केली आहे. 'आमच्या प्रशिक्षकांना शिकण्याची ही चांगली संधी आहे,' अशी प्रतिक्रिया असदुल्ला खान यांनी दिली आहे.