या मॅच फिक्स होत्या, सट्टेबाज सोनू जलानची धक्कादायक कबुली

आयपीएलवेळी झालेल्या सट्टेबाजीमुळे पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. 

Updated: Jun 2, 2018, 07:49 PM IST
या मॅच फिक्स होत्या, सट्टेबाज सोनू जलानची धक्कादायक कबुली

मुंबई : आयपीएलवेळी झालेल्या सट्टेबाजीमुळे पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खाननं सट्टेबाजी केल्याचं कबूल केलं आहे. ठाणे पोलिसांनी याप्रकरणी अरबाज खानची चौकशी केली. सट्टेबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी सोनू जलानला अटक केली. सोनूला अटक केल्यानंतर अरबाज खानचं नाव समोर आलं. सोनूच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी कंपनीसाठी काम करणाऱ्या सोनू जलाननं दोन क्रिकेट मॅच फिक्स केल्या होत्या.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१६)

सोनू जलाननं मुंबईचा आणखी एक बुकी प्रेम तनेजा आणि आपला बिजनेस पार्टनर ज्यूनियर कोलकाताच्या साथीनं श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच फिक्स केली होती. ही मॅच फिक्स करण्यासाठी हे तिघंही श्रीलंकेला गेले आणि पिच क्युरेटर वरनविराच्या साथीनं मॅच फिक्स केली. या मॅचच्या पहिल्याच दिवशी २१ विकेट गेल्या होत्या. प्रेम तनेजा हा तोच बुकी आहे ज्याला मुंबईच्या क्राईम ब्रांचनं आयपीएलच्या फिक्सिंग आणि बेटिंग केसमध्ये विंदू दारा सिंगसोबत अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तनेजानं सोनू जलानची भेट विंदू दारा सिंगसोबत घालवून दिली होती.

पाकिस्तान दिग्गजांमध्ये झालेली मॅच

सोनूनं २०१६ साली पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी एक प्रथम श्रेणी मॅच फिक्स केली होती. ही मॅच फिक्स करण्यासाठी सोनूनं टीमचे मालक हनीफ मलिकची दुबईमध्ये भेट घेतली होती. बॉलीवूडच्या एका बड्या अभिनेत्यानं ही भेट घडवून आणली होती. हनीफ मलिक पाकिस्तानची असून तो इंग्लंडमधला व्यापारी असल्याचं बोललं जातं. भेट घालून देणारा हा अभिनेता मुंबईच्या वांद्रे भागामध्ये राहतो. सोनू जलानकडे या अभिनेत्याचा स्टिंग व्हिडिओदेखील आहे. या व्हिडिओ दाखवून सोनू या बॉलीवूड अभिनेत्याला ब्लॅकमेलही करत आहे.

सोनू जलानचं दाऊद कनेक्शन

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानमध्ये कारभार सांभाळणाऱ्या एहतेशाम आणि डॉक्टर यांच्या संपर्कात सोनू जलान होता. भारत, पाकिस्तान, दुबई आणि अखाती देशांमध्ये सट्टाबाजाराचं कलेक्शन डॉक्टर आणि एहतेशाम यांच्याकडे होतं. हे दोघं अनीस इब्राहिम आणि शकीलला या सगळ्याची माहिती द्यायचे. याचबरोबर सोनू दुबईमध्ये दाऊदच्या एकदम जवळचा समजला जाणारा रईस सिद्दीकी आणि अनिल कोठारी उर्फ अनिल टुंडाच्या संपर्कातही होता. रईस आणि अनिल दोघं डी कंपनीसाठी दुबईत सट्टा बाजार चालवतात.

सोनूकडे महागड्या गाड्या

सोनू जलान मुंबईतल्या एका इमारतीत तीन आलीशान फ्लॅटमध्ये राहतो. यातल्या एका फ्लॅटचं महिन्याचं भाडं १,६०,००० रुपये आहे. याचबरोबर सोनूकडे महागड्या गाड्याही आहेत. तसंच सोनूनं अनेक बेनामी संपत्तीमध्येही गुंतवणूक केली आहे. सोनूच्या घरातून ठाणे पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे. आयपीएलच्या या मोसमात बेटिंगमधून ५०० कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं या डायरीत लिहिण्यात आलं आहे. फक्त फायनलमध्येच १० कोटी रुपये कमावल्याचा उल्लेख या डायरीत करण्यात आला आहे. या डायरीमध्ये देश आणि परदेशातल्या जवळपास ३० बुकींची नावं कोडवर्डसह लिहिण्यात आली आहेत.

कमाई हवालामार्गे पाकिस्तानला

सोनू सट्टाबाजारातून होणारी कमाई हवालामार्गे दुबई आणि दुबईवरून कराचीला पोहोचवायचा. हे हवाला रॅकेट उद्धवस्त करण्याची तयारी आता पोलिसांनी सुरु केली आहे. 

असा चालायचा सट्टा बाजार

सट्ट्याचा खेळ ऑनलाईन चालायचा. सट्टा लावणाऱ्यांना व्हॉट्सअॅपच्या मार्फत पासवर्ड आणि कोड दिला जायचा. पण पैशांची डिलिवरी आणि दुसऱ्या कारणांमुळे भेटण्यासाठी सट्टेबाजांचा ग्रुप वेगवेगळ्या टीमसाठी काम करायचा.

सट्टेबाजांचा ड्रेस कोड

सट्टेबाजांचा ड्रेसकोडही वेगळा असायचा. पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, टी शर्ट आणि जीन्स, घड्याळं आणि चष्मा असा ड्रेस कोड वेगवेगळ्या ग्रुपला दिला जायचा.

१० वर्षांपूर्वीही सोनूला अटक

जवळपास १० वर्षांपूर्वीही आयपीएलचा घोटाळा समोर आला होता. याप्रकरणीही सोनूला अटक करण्यात आली होती. २०१२ साली आयपीएल मॅचवेळी सट्टा लावताना सोनूला अटक करण्यात आली होती.