मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलिन खेळाडूंचा रडीचा डाव कॅमे-यात कैद झालाय.
तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचे समोर आलंय. दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील 43व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटर बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना दिसला. चेंडूला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.
बॅन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बॅन्क्रॉफ्टने या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बॅन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने बॅन्क्रॉफ्टच्या चेंडूशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारलीय. या सगळ्या गोष्टीचा खेद वाटतो आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही अशी ग्वाही त्यानं दिलीय. मात्र या आरोपांमुळे कर्णधारपद सोडणार नसल्याचे स्मिथने स्पष्ट केलंय.
आयसीसी नियमानुसार बॅन्क्रॉफ्ट दोषी आढळल्यास त्याच्यावर एक सामन्याची बंदी आणि 100 टक्के मानधनाचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.