टी-20 वर्ल्डकपनंतर आता भारतीय संघाचं लक्ष चॅम्पिअन्स ट्रॉफीकडे आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान चॅम्पिअन्स ट्रॉफी होणार आहे. पण भारतासमोर सर्वात मोठा अडथळा आहे, तो म्हणजे ही स्पर्धा पाकिस्तानात पार पडणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यापूर्वीच स्पर्धेच्या वेळापत्रकाचा अधिकृत मसुदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवला आहे. यानुसार 1 मार्चला लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये भारत-पाकिस्तान सामना नियोजित आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताचे ग्रुप स्टेजमधील सर्व सामने लाहोरमध्ये खेळले जाणार अस्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मसुद्यात दिली आहे.
पण सर्वात मोठा प्रश्न आहे की, दोन्ही देशांमधील राजकीय संबंध ताणलेले असताना भारत चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार की नाही? दरम्यान एका रिपोर्टनुसार, भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही. पण केंद्र सरकारचे यासंबंधी अंतिम निर्णय घेईल.
एका सूत्राने 'स्पोर्ट्स तक'ला दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही चॅम्पिअन्स ट्रॉफीबद्दल काहीच चर्चा केलेली नाही. पण भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता कमीच आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाईल".
गतवर्षी पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार होती, मात्र भारतीय संघाला सरकारकडून पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. यानंतर श्रीलंकेत भारताचे सामने खेळवले जातील असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान यावेळीही हायब्रीड मॉडेलचा अवलंब केला जाऊ शकतो का? असं विचारलं असता, बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं की, आयसीसीच्या पुढील बोर्डाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
"आम्ही यासंबंधी चर्चा केलेली नाही. सरकार यासंबंधी निर्णय घेईल. ही आयसीसी स्पर्धा असल्याने आम्ही त्यासंबंधी निर्णय घेऊ शकत नाही. आयसीसीच्या पुढील बैठकीत चॅम्पिअन्स ट्रॉफीसंदर्भात काहीतरी निर्णय होऊ शकतो," असं सूत्राने सांगितलं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. दोन्ही देशातील राजकीय संबंध ताणल्याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली होती जेव्हा पाकिस्तानने अनेक एकदिवसीय आणि T20I खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता.