विशाखापट्टणम : आयपीएलच्या १२ व्या पर्वासाठी आज क्वालिफायर-२ सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना गतविजेत्या चेन्नई आणि दिल्ली यांच्यात होणार आहे. आजचा सामना जिंकणारी टीम १२ मे ला मुंबईसोबत अंतिम सामना खेळेल. हा सामना एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.
दिल्ली टीमला आयपीएलच्या एकाही पर्वात अंतिम सामन्यात धडक मारता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईला हरवून अंतिम फेरीत जाण्याचे दिल्लीचे प्रयत्न असतील. चेन्नई- दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण २० सामने खेळले आहेत. त्यापैकी १४ सामन्यात चेन्नई तर ६ सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. त्यामुळे आकडेवारनुसार चेन्नईचं दिल्लीविरुद्ध खेळताना वर्चस्व दिसून येतं.
दिल्लीच्या टीममध्ये बहुतांश प्रमाणात युवा खेळाडू आहेत. त्यात प्रामुख्याने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, श्रेयस अय्यरचा समावेश आहे. तसेच शिखर धवन सारख्या अनुभवी खेळाडू देखील टीममध्ये आहे. ही चौकडीने यंजदाच्या पर्वात चांगली खेळी केली आहे. दिल्लीकडून खेळताना शिखर धवनने सर्वाधिक म्हणजेच ५०३ धावा केल्या आहेत. एका हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करण्याची ही धवनची ३ री वेळ आहे. त्यामुळे धवन चांगल्या जोमात आहे.
एलिमिनेटर सामन्यात दिल्लीला विजय मिळवून देण्यात पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतचा मोलाचा वाटा राहिला आहे. पृथ्वीने टीमला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने ५६ रन केल्या. तर पंतने निर्णायक वेळी २१ बॉलमध्ये ४९ रनची स्फोटक खेळी केली.
त्यामुळे या चारही खेळाडूंकडून क्वालिफायर-२ च्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा दिल्लीकरांना आणि समर्थकांना असेल. दिल्लीच्या बॉलिंगची मदार ही प्रामुख्याने अनुभवी इशांत शर्मा, ट्रेंट बोल्ट, किमो पॉल आणि अमित मिश्रा यांच्यावर असेल. दिल्लीचा यशस्वी बॉलर खगिसो रबाडा मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्यांची उणीव टीममध्ये भासेल.
दिल्लीसाठी एक जमेची बाजू आहे. आजचा सामना हा विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. याच मैदानावर एलिमिनेटरचा सामना खेळण्यात आला होता. त्यामुळे या मैदानावर कशा प्रकारे खेळायचे याचा अनुभव त्यांना आहे.
दिल्लीच्या तुलनेत चेन्नईचे खेळाडू आणि प्लेऑफच्या सामन्यांच्या तुलनेत अनुभवी आहे. चेन्नई याआधी एकूण ७ वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद चेन्नईने आपल्या नावे केले आहे. चेन्नईला प्ले-ऑफच्या सामन्यांचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे. चेन्नई अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांना अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी मिळाली. मुंबईने चेन्नईचा क्वालिफायर-१ मध्ये ६ विकेटने पराभव केला.
चेन्नईकडे कॅप्टन कूल धोनी, शेन वॉटसन यासारख्या अनुभवी आणि निर्णायक खेळी करणारे खेळाडू आहेत. धोनीकडून आजच्या सामन्यात चेन्नईच्या चाहत्यांना मोठ्या आणि चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. चेन्नईच्या बॉलिंगची जबाबदारी ही अनुभवी हरभजन सिंग, इमरान ताहिर आणि रविंद्र जाडेजा या तिघांच्य़ा खांद्यावर असेल. या फिरकी समोर खेळण्याचे आव्हान दिल्लीच्या खेळाडूंपुढे असेल.
चेन्नईचा पहिल्या प्लेऑफ सामन्यात मुंबईकडून पराभव झाला. त्यामुळे आजच्या क्वालिफायरच्या सामान्यात चेन्नईवर थोड्या प्रमाणात दबाव असेल. चेन्नईच्या शेन वॉटसन आणि कॅप्टन कूल धोनीकडून सर्वांनाच चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.