Kusal Mendis: सोमवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशाने पराभव केला. या सामन्यात बांगलादेशावर चिटींग केल्याचा आरोप करण्यात येतोय. तर दुसरीकडे बांगलादेशाचा हा दुसरा विजय होता. दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात शाकिब अल हसन आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्यात मोठा वाद पहायला मिळाला. दरम्यान सामना झाल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसने यावर मोठं विधान केलं आहे.
या सामन्यामध्ये श्रीलंका फलंदाजी करत असताना एक मोठी घटना घडली. श्रीलंकेच्या डावाच्या 25 व्या ओव्हरमध्ये अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) फलंदाजीला आला. यावेळी जरा गडबड झाली. मॅथ्यूजला मैदानात येताना योग्य हेल्मेट आणता आलं नसल्याने त्याने रिझर्व खेळाडूंना हेल्टेम आणण्याचा इशारा केला. यादरम्यान बांगलादेशचा कॅप्टन शाकिब-अल-हसन (Shakib Al Hasan) याने मैदानावरील पंचांकडून 'टाइम आऊट'चं आवाहन केलं. अखेरीस मॅथ्यूजला एकंही बॉल न खेळाता माघारी परतावं लागलं. यावर सामना संपल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिसने वक्तव्य केलंय.
श्रीलंकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर कुसल मेंडिसने सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सांगितलं की, अँजेलो मॅथ्यूजच्या विकेटबाबत अंपायर योग्य निर्णय घेऊ शकले नाहीत. कुशल मेंडिस म्हणाला, “चरिथने या सामन्यात उत्तम खेळी खेळली. पण आम्ही 30-40 रन्सने कमी पडलो. पण काही युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली याचा आनंद आहे. मात्र भविष्यात आमची चांगली टीम असणार आहे. आमच्या प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली होती, काही चुकाही झाल्या होत्या.
कुशल मेंडिस पुढे म्हणाला की, “जर आम्ही चांगले क्रिकेट खेळलो असतो तर आम्हाला आणखी चांगली संधी मिळाली असती. अँजेलो क्रीझवर आला तेव्हा 5 सेकंद बाकी होते. तेव्हा हेल्मेटचा पट्टा निघाल्याचं त्याच्या लक्षात आले. मात्र यामध्ये अंपायर पुढे येऊन योग्य निर्णय घेऊ शकले नाहीत. ही निराशाजनक बाब आहे”
नियम 40.1.1 नुसार, विकेट गेल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील बॉल खेळण्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. वर्ल्ड कपसाठी ही मर्यादा 2 मिनिटांची आहे. नवीन फलंदाज तसं करू शकला नाही तर त्याला आऊट घोषित केलं जातं. याला 'टाइम आउट' म्हणतात.