2007 World Cup Hero FIR : 2007 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) पहिल्यावहिल्या टी20 विश्वचषकावर नाव कोरलं. या विजयाचा खरा हिरो ठरला होता तो वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा (Joginder Sharma). अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात जोगिंदरने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर तो हरियाणात डीएसपी पदावर होता. पण आता जोगिंदर शर्माच्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. जोगिंदर शर्मासह सहा लोकांवर हिसारच्या आझादनगर पोलीस स्थानकात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. हिसारमधल्या डाबडा गावातील पवन नावाच्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपिंविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणं तसंच एससी-एसटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर कारवाई करण्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत. याप्रकरणात याआधीही तक्रार दाखल करण्यात आली होती. आता नव्याने या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हिसारमधल्या पाबडा गावात राहणाऱ्या सुनीता नावाच्या महिलेने आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुनीता यांचा घरावरुन अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र सिंहाग आणि इतर लोकांबरोबर वाद सुरु होता. या वादामुले सुनीता यांचा मुलगा पवन हा खूप त्रस्त झाला होता. एक जानेवारीला पवनने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करत सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली. पवनची आई सुनीताने दिलेल्या तक्रारीत अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र सिंहाग यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा याचं नावही घेतलं आहे. पवनला त्रास दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जोगिंदर शर्माची प्रतिक्रिया
मृत पवनच्या कुटुंबियांनी हिसारमधल्या जिल्हा रुग्णालयासमोर धरणं आंदोलन सुरु केलं आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका मृत पवनच्या कुटुंबियांनी घेतली आहे. यावर बोलताना डीएसपी जोगिंदर शर्मा याने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. पवनला आपण ओळखत नाही किंवा त्याला कधी भेटलोही नाही असं जोगिंदर शर्माने म्हटलंय.
कोण आहे जोगिंदर शर्मा?
जोगिंदर शर्मा भारताचा माजी वेगवान गोलंदाज आहे. 2007 टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माने शेवटच्या शटकात मिसबाह-उल-हकची विकेट घेतली आणि भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. या कामगिरीचा सन्मान म्हणून हरियाणा सरकारने त्याला पोलीसात डीएसपी पदाची नोकरी दिली. जोगिंदर शर्मा सध्या कालका इथं तैनात आहे. हरियाणाल्या रोहतकमध्ये जन्मलेला जोगिंदर शर्मा भारतासाठी 4 एकदिवसीय आणि 4 टी20 सामने खेळला आहे. 2004 मध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात डेब्यू केला तर 2007 मध्ये तो भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्यो जोगिदरच्या नावावर पाच विकेट जमा आहेत.